नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांविरोधात भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तर्फे येत्या २४ मार्च २०२६ रोजी राजधानी दिल्ली येथे भव्य ‘चलो दिल्ली’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या वतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली असून देशभरातील शेतकरी, कामगार, युवक व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या माध्यमातून रोजगार, कृषी, खासगीकरण, श्रमकायदे आणि आंतरराष्ट्रीय करार यांसारख्या मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला जाणार आहे. मनरेगाच्या जागी नवीन रोजगार धोरणे, वीज व बीज विधेयकांमुळे शेतकऱ्यांवर होणारा परिणाम, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील वाढते खासगीकरण, नवीन लेबर कोड्समुळे कामगारांवर होणारे परिणाम तसेच परदेशी व्यापार करारांमुळे देशहिताला धोका निर्माण होत असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे.
“जनहिताच्या प्रश्नांवर आवाज बुलंद करण्यासाठी दिल्ली चला” असे आवाहन करण्यात आले असून देशभरातून हजारो कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना होणार असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारने आपली धोरणे पुनर्विचार करावीत आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात येणार आहे.
Tags
||महाराष्ट्र||
