किनवट, ता.८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील त्यागमुर्ती माता रमाबाई चौक येथे जयंती कार्यक्रम उत्साहात व भक्तीभावाने नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच माता रमाबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार, पोलिस निरीक्षक गणेश कराड, नगरसेविका ललिता मुनेश्वर, बांधकाम सभापती श्रीराम नेम्मानिवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात माता रमाबाई यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या त्याग, संघर्ष आणि समर्पणाची आठवण करून देण्यात आली.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत माता रमाबाई यांनी बाबासाहेब आंबेडकरांना खंबीर साथ देत समाजपरिवर्तनाच्या लढ्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या त्याग, संयम व समाजावरील प्रेमामुळेच बाबासाहेबांना मोठे कार्य करण्याचे बळ मिळाले. महिलांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन शिक्षण, सामाजिक कार्य व आत्मसन्मानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाला पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश बोदमवाड, नितिन कदम, शिवा अनंतवार, गंगुबाई परेकार, प्रा. जयश्री भरणे, पुष्पांजली कांबळे, अश्विन भरणे, अनिल कांबळे, विद्या पाटील, विजया खाडे, मयुरी कांबळे, निवेदक कानिंदे, ब्रम्हा एड्के यांच्यासह शहरातील महिला, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून आयोजित हा कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
