
दिनकर चाडावार
किनवट,ता .६ : शहरातील शिवाजी नगर परिसरात रेल्वे प्रशासनाने नुकताच उभारलेला रेल्वे अंडरब्रिज नागरिकांसाठी सोयीचा ठरण्याऐवजी सध्या मोठा त्रासदायक बनल्याचे चित्र दिसून येत आहे. अंडरब्रिजमुळे वाहतुकीचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा होती; मात्र अवघ्या शंभर मीटरच्या अंतरात उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे.
अंडरब्रिज परिसरात रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण किंवा दर्जेदार डांबरीकरण अद्याप पूर्ण झालेले नसल्याने वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे धुळीचे मोठे लोट उडत आहेत. यामुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक, शालेय विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. धुळीमुळे श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, अॅलर्जी यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका निर्माण झाला असून, वाहनचालकांची दृष्टी कमी होत असल्याने अपघाताची शक्यताही वाढली असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष दिनकर चाडावार यांनी आक्रमक भूमिका घेत रेल्वे प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अंडरब्रिज परिसरात आणखी एक सिमेंट काँक्रीटचा थर टाकून योग्य प्रकारे क्युरिंग करावे किंवा दर्जेदार डांबरीकरण करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याने प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
समस्या तात्काळ सोडवली नाही तर शिवाजी नगर परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चाडावार यांनी दिला. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, अंडरब्रिज परिसरातील नागरिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “अंडरब्रिजमुळे सोय होईल असे वाटले होते; मात्र धुळीमुळे घरात राहणेही कठीण झाले आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Tags
||जिल्हा||