किनवट तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल घोटी या गावात दि. ०६ फेब्रुवारी १९५१ रोजी आनंदराव वाढे यांचा जन्म एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला. वडील सखाराम वाढे आणि आई सगुनाबाई या अशिक्षित असल्या तरी मुलांनी शिकून मोठे व्हावे, ही त्यांची जिद्द होती. आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही शिक्षणाची ओढ आणि कष्टाची तयारी या बळावर वाढे साहेबांनी आपला शैक्षणिक प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला.
घोटी येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर जि.प. हायस्कूल, किनवट येथे त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद येथून बी.एस्सी. पदवी आणि त्यानंतर बी.एड. ही अध्यापन पदवी मिळवत त्यांनी शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. विदर्भातील पोहंडूळ (ता. पुसद) येथील जि.प. शाळेत सहशिक्षक म्हणून सुरू झालेला प्रवास पुढे मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी अशा विविध जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला.
शिक्षणक्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला. विशेषतः गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून काम करताना आलेले अनुभव त्यांच्या धैर्याची आणि कर्तव्यनिष्ठेची साक्ष देतात. कठीण परिस्थितीतही शिक्षणाची गाडी रुळावर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय ठरला.
नांदेड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी असताना त्यांनी पात्र शैक्षणिक संस्थांच्या प्रस्तावांना वेळेवर शिफारस करून अनेक संस्थांना उभारी दिली. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी किनवट तालुक्यातील अनेक शैक्षणिक उपक्रमांना त्यांच्या सहकार्याचा लाभ झाला, अशी भावना आजही अनेक संस्थापक व्यक्त करतात.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी शिक्षणसेवा थांबवली नाही. फुले–शाहू–आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत ओम शिक्षण संस्था, सुभाषनगर (कृ.), फुलाजी बाबा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, बिलोरी–धानोरा आणि सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, उमरी (बा.) यांसारख्या उपक्रमांतून दुर्गम भागात शैक्षणिक प्रवाह टिकवून ठेवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. मागील दशकभरापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करून त्यांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला आहे.
साधेपणा, मितभाषी स्वभाव आणि सदैव हसतमुख राहणी ही त्यांची ओळख. सर्व स्तरांतील मित्रपरिवार त्यांनी आपल्या वर्तनातून जोडला आहे. “विद्यार्थ्यांना भूतकाळाची जाणीव देऊन वर्तमानात उभे करून भविष्याची दिशा दाखवणारा तोच खरा शिक्षक,” या साने गुरुजींच्या विचारांना त्यांनी आयुष्यभर जपले. पेशाने, हाडाचे आणि वृत्तीने—या तिन्ही प्रकारचे शिक्षक त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.
आज अमृतमहोत्सवी टप्प्यावर उभे असताना वाढे साहेबांचे आयुष्य म्हणजे शिक्षण, समाजसेवा आणि मूल्यनिष्ठ जीवनाचा प्रेरणादायी प्रवास आहे. त्यांच्या पुढील आयुष्याचा मार्ग सुख, समाधान आणि उत्तम आरोग्याने परिपूर्ण राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.
Tags
||महाराष्ट||
