संविधानाच्या बळावर महिलांचा सशक्तीकरणाचा मार्ग : ॲड. दीपा सोनकांबळे


किनवट : नुकत्याच झालेल्या १५ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत दुसऱ्या दिवशी पार पडलेले तिसरे सत्र महिलांच्या सशक्तीकरणाच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी ठरले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी आलंकृता कश्यप (ठाणे) होत्या, तर प्रमुख वक्त्या म्हणून किनवट न्यायालयातील ॲड. दीपा ह. सोनकांबळे-सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.

आपल्या अभ्यासपूर्ण व प्रभावी भाषणात ॲड. सोनकांबळे यांनी स्पष्ट केले की, भारतीय संविधान हे महिलांच्या प्रगतीचे खरे कवच आहे. संविधानाने महिलांना केवळ मतदानाचा अधिकारच दिला नाही, तर सन्मानाने व समानतेने जगण्याचा अधिकारही प्रदान केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान देत त्यांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा केला, असे त्यांनी नमूद केले.
       महिलांना कायदेशीर बाबींची सखोल माहिती व्हावी या उद्देशाने त्यांनी विविध महत्त्वाच्या कायद्यांवर प्रकाश टाकला. हिंदू वारसा कायदा (सुधारणा २००५) अंतर्गत मुलींना वडिलांच्या संपत्तीत मुलांइतकाच समान हक्क मिळाल्याने महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा (२००५) महिलांना घरगुती छळाविरुद्ध कायदेशीर संरक्षण देतो, तर हुंडा प्रतिबंधक कायदा (१९६१) समाजातील अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा ठरतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
    संविधानाने दिलेले अधिकार केवळ कागदावर न राहता कृतीत उतरले पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन घडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. महिलांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी सजग राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या सत्रास परिषदेचे पदाधिकारी, देश-विदेशातून आलेले प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. सत्राचे सूत्रसंचालन प्रा. गजानन सोनोने यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. वासुदेव शेंदे यांनी केले.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp