पुणे : राज्यातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या EPOS मशीनवरील नवीन स्कॅनर प्रणालीमुळे परवानाधारक व लाभार्थींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन, पुणे (रजि.) यांनी केला आहे. या संदर्भात फेडरेशनतर्फे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शासनाने वितरण प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिलेल्या EPOS मशीनमध्ये नव्याने बसविण्यात आलेल्या स्कॅनरमुळे लाभार्थ्यांच्या अंगठ्याच्या ठशांची पडताळणी करताना वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. अनेक वेळा लाईन खंडित होणे, सर्व्हर डाऊन होणे किंवा मशीन हँग होणे अशा तांत्रिक समस्यांमुळे धान्य वितरण प्रक्रियेत विलंब होत असल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामी, लाभार्थींना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून परवानाधारकांवर अनावश्यक ताण येत आहे.
तसेच, OTP प्रणालीद्वारे पडताळणी करतानाही अनेक लाभार्थ्यांकडे मोबाईल सुविधा नसल्याने किंवा नेटवर्कच्या अडचणींमुळे व्यवहार पूर्ण होत नाहीत. वृद्ध, दिव्यांग व दुर्गम भागातील नागरिकांना विशेषतः या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे फेडरेशनने नमूद केले आहे.
याशिवाय, शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या IRIS Eye स्कॅनर प्रणालीबाबतही अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. लाभार्थ्यांच्या डोळ्यांच्या पडताळणीसाठी लागणारा कालावधी जास्त असल्याने वितरण प्रक्रिया अधिक वेळखाऊ ठरत आहे. त्यामुळे वितरणात अडथळे निर्माण होऊन परवानाधारक व ग्राहक यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता वाढत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, शासनाने तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून वितरण प्रक्रिया सुरळीत करावी, EPOS मशीन व स्कॅनर प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात आणि लाभार्थ्यांना अडचणीतून मुक्त करावे, अशी मागणी फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य फेडरेशनचे पदाधिकारी व परवानाधारक यांच्या सहमतीने हे निवेदन सादर करण्यात आल्याचे शेवटी नमूद करण्यात आले आहे.
Tags
||महाराष्ट्र||