नांदेड : अर्धापूर(जिल्हा नांदेड) जी. प. हायस्कूल येथील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी दीपक कदम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन आणि अभ्यासाच्या योग्य पद्धतींबाबत सखोल मार्गदर्शन केले.
मोठ्या प्रमाणात अल्पसंख्य विद्यार्थिनी शिक्षण घेत असलेल्या या शाळेसाठी आंबेडकरवादी मिशन तर्फे रुपये २५,००० किमतीचे UPSC–NEXT IAS मार्गदर्शक ग्रंथदान करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी दर्जेदार संदर्भ साहित्य उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी अभ्यासातील शंका विचारल्या, तर दीपक कदम यांनी प्रेरणादायी उदाहरणांसह मार्गदर्शन करत सातत्य, नियोजन आणि योग्य मार्गदर्शकांच्या मदतीचे महत्त्व अधोरेखित केले. शाळा प्रशासन, शिक्षकवर्ग आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आंबेडकरवादी मिशनचे आभार मानले.