
लोकनाथ यशवंत
नांदेड : विद्रोही सांस्कृतिक चळवळच्या वतीने नांदेड येथे होणाऱ्या विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, लेखक व अनुवादक लोकनाथ यशवंत (नागपूर) यांची निवड करण्यात आली आहे. ही माहिती मंगळवारी (दि.३) आयोजित पत्रकार परिषदेत चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी व संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहुल एस. एम. प्रधान यांनी दिली.
हे साहित्य संमेलन दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेज मैदानावर होणार आहे. या संमेलनात लोकनाथ यशवंत हे मागील, एकोणिसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा (यवतमाळ) यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही जीवनाच्या सर्व क्षेत्रांत समतेचा आणि मानवमुक्तीचा विचार केंद्रस्थानी ठेवणारी चळवळ आहे. पारंपरिक मराठी साहित्य संमेलनांनी कालौघात विषमतावादी सांस्कृतिक राजकारणाचे रूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर, पर्यायी आणि परिवर्तनवादी साहित्य व्यासपीठ म्हणून विद्रोही साहित्य संमेलनांची परंपरा १९९९ पासून सुरू आहे. मुंबई (धारावी), कोल्हापूर, अमरावती, सोलापूर, नंदुरबार, पुणे, नाशिक, परभणी, बुलढाणा, हिंगोली, उदगीर, वर्धा, अमळनेर, छत्रपती संभाजीनगर यांसह विविध ठिकाणी आतापर्यंत १९ साहित्य संमेलने, एक आंतरराज्य (निपाणी) तसेच एक विद्रोही स्त्री साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पडले आहेत.
या संमेलनांच्या अध्यक्षपदावर कालकथित बाबुराव बागुल, वाहरु सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजिज नदाफ, आत्माराम कनीराम राठोड, कॉ. तारा रेड्डी, तुळसी परब, डॉ. आ. ह. साळुंखे, संजय पवार, जयंत पवार, उर्मिला पवार, डॉ. प्रतिभा अहिरे, विमल मोरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते, चंद्रकांत वानखेडे, डॉ. वासुदेव मुलाटे व डॉ. अशोक राणा यांसारख्या अनेक सर्जनशील साहित्यिकांनी अध्यक्षपदे भूषवली आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. प्रतिमा परदेशी यांनी सांगितले की, दलित, पीडित व शोषित समाजाच्या वेदनांना मराठी कवितेच्या केंद्रस्थानी आणणाऱ्या कवींच्या परंपरेत लोकनाथ यशवंत यांचे स्थान अग्रगण्य आहे. गेली पाच दशके ते सातत्याने लेखन करत असून त्यांच्या कवितेमुळे मराठी कवितेचा सामाजिक व वैचारिक चेहरा मूलगामी बदलला आहे. विवेकनिष्ठ परिवर्तनाची आस, उपरोध आणि आत्मटीकेची धार ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये असून सत्तेच्या दमनकारी प्रवृत्तीविरोधात त्यांची कविता ठामपणे उभी राहते, असेही त्यांनी नमूद केले.
लोकनाथ यशवंत यांचे ‘आता होऊन जाऊ द्या!’, ‘आणि शेवटी काय झाले?’, ‘पुन्हा चाल करू या…’, ‘बाकी सर्व ठीक आहे…’ व ‘हे तर होणार होते हे’ असे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कवितांचे हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झाले असून ‘बैल’ या कवितेवर आधारित ‘बाईस्कोप’ हा मराठी चित्रपटही तयार झाला आहे. त्यांच्या कवितांचा समावेश विविध राज्यांतील शैक्षणिक अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
सध्याच्या विद्वेषी आणि अस्थिर सामाजिक-राजकीय परिस्थितीत सत्य, मानवता आणि संविधानिक मूल्यांची बाजू मांडणाऱ्या लोकनाथ यशवंत यांच्या निवडीमुळे हे विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन फुले–शाहू–आंबेडकर विचारपरंपरेला अधिक बळ देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष राहुल एस. एम. प्रधान, संघटक किशोर ढमाले, कोषाध्यक्ष डॉ. अनंत राऊत, डॉ. भारत शिरसाठ, ॲड. वैशाली डोळस, अनंत भवरे यांच्यासह विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
