विसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप पर्यायी संस्कृती, समता आणि विवेकाचा बुलंद आवाज


नांदेड : राजा ढाले साहित्य नगरी, सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल मैदान, सायन्स कॉलेज येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा समारोप समता, विवेकवाद आणि पर्यायी संस्कृतीच्या निर्धाराने झाला. तीन दिवसांच्या या वैचारिक मेळाव्यात विचारमंथन, काव्यवाचन, शाहिरी आणि सामाजिक संवाद यांचा प्रभावी संगम अनुभवायला मिळाला.



महाराष्ट्राच्या विविध भागांतून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण तसेच आदिवासी पट्ट्यातून मोठ्या संख्येने कवी, लेखक, अभ्यासक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे संमेलनाला व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक आशय प्राप्त झाला.
‘पर्यायी संस्कृती निर्माण : पुढील आव्हाने’ या विशेष सत्रात दिल्लीचे ज्येष्ठ इतिहासकार प्रा. रतनलाल यांनी शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणावर कठोर शब्दांत टीका केली. इंग्रजी शिक्षण महागडे होत चालल्याने सामाजिक विषमता वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘प्रबुद्ध भारत’ संकल्पनेचा उल्लेख करत, “मुलांना अंधभक्त नव्हे तर विवेकवादी, प्रश्न विचारणारे नागरिक घडवा,” असे त्यांनी स्पष्ट आवाहन केले.


‘भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण : हिंदी सक्ती आणि अभिजात भाषेच्या निमित्ताने’ या परिसंवादात मुंबईच्या डॉ. वंदना महाजन यांनी भाषेतील सत्तासंबंधांचा वेध घेतला. “कोणतीही बोली कनिष्ठ नसते; तीही भाषा असते. भाषा वर्चस्वाचे नव्हे तर संवादाचे माध्यम असले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. डॉ. निळकंठ शेरे (रायगड), डॉ. दिलीप चव्हाण (नांदेड) आणि अरविंद सुरवाडे (मुंबई) यांनीही भाषिक अस्मिता आणि हिंदी सक्तीच्या प्रश्नांवर परखड भूमिका मांडली.


डॉ. आदिनाथ इंगोले, ज्योती दुधमल आणि सर्जेराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे कवी संमेलन पार पडले. डॉ. भास्कर गायकवाड व कपिल दगडे यांनी सूत्रसंचालन केले. विद्रोही आशयाच्या कवितांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. ‘लोकआख्यान : शाहिरांचे गणराज्य – लोकशाहीच्या सांस्कृतिक प्रवासाचे संगीत व्याख्यान’ हा कार्यक्रम संपादक-विचारवंत ज्ञानेश महाराज यांनी सादर केला. शाहिरी, प्रबोधन आणि लोकशाही मूल्यांचा सुरेल संगम त्यांनी घडवून आणला. संविधान गीत, रॅप सादरीकरण आणि युवा मंचावरील कार्यक्रमांनी तरुणाईला विशेष आकर्षित केले. बालमंचावरही छोट्या कलावंतांनी उत्स्फूर्त सादरीकरण केले.
समारोप सत्रात अध्यक्ष कवी लोकनाथ यशवंत यांच्या ‘…हे तर होणारच होते’ या नव्या कवितासंग्रहाचे प्रकाशन सुषमा लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते झाले. याच वेळी जातिमुक्त गावाचा ठराव प्रत्यक्षात राबविणाऱ्या सौंदाळा (ता. नेवासा) येथील सरपंच शरद अरगडे आणि सत्यशोधक बाबा अरगडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
संमेलनस्थळी उभारलेल्या पुस्तक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लाखो रुपयांची पुस्तक विक्री झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. समारोप प्रसंगी एकूण २१ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्यामध्ये हिंदी सक्ती रद्द करणे, मराठी शाळा बंद करण्याचे धोरण मागे घेणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाईनुसार वाढ, खाजगी क्षेत्रात आरक्षणाची अंमलबजावणी, शिक्षणातील समानता, भाषिक स्वातंत्र्य, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि सामाजिक न्याय यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश होता.
स्वागताध्यक्ष राहुल एस. एम. प्रधान, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले, डॉ. राजेंद्र गोणारकर, कमलबाई सरोदे, डॉ. अनंत राऊत, डॉ. आदिनाथ इंगोले, युवराज थोरात, अर्जुन बागुल, उज्वला पडलवार, राज गोडबोले, डॉ. विजयकुमार माहुरे, डॉ. स्वाती सरोदे, डॉ. प्रेरणा ढवळे, डॉ. हेमंत कार्ले आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून हे संमेलन यशस्वीरीत्या पार पडले.
समता, विवेक आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचा निर्धार व्यक्त करत विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp