किनवट : भारत जोडो युवा अकादमी संचालित साने गुरुजी रुग्णालय व संशोधन केंद्र, किनवट यांच्या वतीने मंगळवारी (दि.१७) रुग्णालयाच्या सभागृहात भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून ‘सर्वधर्म समभाव’ आणि सामाजिक एकतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मौलाना सादत यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाली. त्यांनी रमजान महिन्याचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, रमजान हा केवळ उपासनेचा महिना नसून नेकी करण्याचा आणि गरजू-गरीबांना मदत करण्याचा सुवर्णकाळ आहे. “मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष इसाखान, के. मूर्ती, उपनगराध्यक्ष हसन लाला, राघु मामा, जहिर खान, शेख अली, इनायत भाटी, निसार भाटी, नसिर तगाले, बाबा साहेब सूर्यवंशी, डॉ. योगेंद्र वरटकर, डॉ. भाग्यश्री बेलखोडे, संकेत आंबटकर यांच्यासह रुग्णालयाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजात बंधुभाव आणि सौहार्द टिकवण्यासाठी डॉ. अशोक बेलखोडे व साने गुरुजी रुग्णालय परिवार सातत्याने प्रयत्नशील असून, दरवर्षी अशा इफ्तार मेळाव्याचे आयोजन करून सामाजिक ऐक्य दृढ करण्याचे कार्य केले जाते. उपस्थितांनी या उपक्रमाचे तसेच डॉ. अशोक बेलखोडे यांच्या कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सामूहिक प्रार्थना करून देशात शांतता, समृद्धी आणि सौहार्द नांदावे, अशी प्रार्थना केली. अखेरीस डॉ. अशोक बेलखोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Tags
||जिल्हा||


