शिवाजीनगर अंडरब्रिज दुरुस्तीला सुरुवात; नगराध्यक्षा येंड्रलवार यांच्या पाठपुराव्याला यश


किनवट, ता.१८ : किनवट शहरातील शिवाजीनगर परिसरातील रेल्वे अंडरब्रिज (RUB) येथील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास नागरिकांना दीर्घकाळ सहन करावा लागत होता. या धुळीमुळे आरोग्यावरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढताच नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांनी तातडीने या प्रश्नात लक्ष घालत रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

    येंड्रलवार यांनी ११ मार्च रोजी दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद येथील जनरल मॅनेजर तसेच नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांना लेखी निवेदन पाठवून अंडरब्रिजवरील निकृष्ट कामाची माहिती देत त्वरित दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानंतर १४ मार्च रोजी ई-मेलद्वारेही त्यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना कळवली.
    या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत रेल्वे प्रशासनाने १७ मार्च रोजी अधिकृत पत्राद्वारे दुरुस्ती कामास मान्यता दिली. त्यानुसार, लेव्हल क्रॉसिंग क्रमांक १२ (कि.मी. ११७/२-३) येथील अंडरब्रिजवरील रस्त्याच्या पृष्ठभागाचे काम १८ मार्च ते २५ मार्च २०२६ दरम्यान करण्यात येणार आहे. या कालावधीत संबंधित मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असून पर्यायी मार्ग म्हणून RUB क्रमांक १४०A (सुभाष नगर अंडरब्रिज) मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.
    या दुरुस्तीमुळे शिवाजीनगर परिसरातील धुळीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, कामाच्या कालावधीत प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा उपाययोजना आणि दिशादर्शक फलक लावण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp