किनवट, ता.१८ : शहरातील शिवाजीनगर परिसरातील रेल्वे अंडरब्रिजचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याची दखल घेत किनवट नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद येंड्रलवार यांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
शिवाजीनगर भागातील हा अंडरब्रिज नागरिक, विद्यार्थी तसेच वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, येथे करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे वाहनांची ये-जा होताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. परिणामी प्रवाशांना धुराच्या लोटांचा सामना करावा लागत असून डोळ्यांची जळजळ, श्वसनास त्रास यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा येंड्रलवार यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद येथील जनरल मॅनेजर तसेच नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना लेखी निवेदन पाठवून या समस्येकडे तातडीने लक्ष वेधले आहे.
निवेदनात अंडरब्रिजची त्वरित तांत्रिक तपासणी करून सिमेंटच्या धुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच त्या ठिकाणी डांबराचा योग्य थर टाकून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशीही ठाम भूमिका त्यांनी मांइडली आहे.दरम्यान, या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून रेल्वे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Tags
||जिल्हा||
