वैचारिक अधिष्ठान मजबूत ठेवून स्पर्धा परीक्षांची तयारी करा : जिल्हाधिकारी राहुल कार्डिले


नांदेड : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली वैचारिक पायाभरणी भक्कम ठेवत आपल्या मुळांचा विसर न पडू देता अभ्यास केल्यास निश्चित यश मिळते, असे मार्गदर्शन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कार्डिले (IAS) यांनी केले.

आंबेडकरवादी मिशनच्या वतीने आयोजित यूपीएससीमध्ये निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. स्पर्धा परीक्षांचा तयारीचा कालावधी दीर्घ असतो. या काळात संयम, सातत्य आणि पर्यायी नियोजन (बी प्लॅन) महत्त्वाचे असते, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
या कार्यक्रमात यूपीएससीमध्ये यश संपादन केलेल्या अतुल राजूरकर (IPS), डॉ. प्रीतम भाले (IPS) तसेच कंधार येथील ऋषिकेश पालीमकर (IAS) यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. प्रीतम भाले यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण यश मिळविले असून याच विचारांचा आदर्श ठेवून प्रशासनात कार्य करणार असल्याचे सांगितले. अतुल राजूरकर यांनी दोन वेळा यूपीएससीमध्ये यश मिळवले असून मागील वर्षी आयपीएस पद मिळाल्यानंतरही पुन्हा प्रयत्न करून यश मिळविले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान आंबेडकरवादी मिशनचे मार्गदर्शन व कुटुंबियांचा त्याग हे आपल्या यशाचे मुख्य आधार असल्याचे त्यांनी नमूद केले.
कंधारचे ऋषिकेश पालीमकर यांनी दीर्घकाळ संयम राखत यश-अपयश पचवत अखेर आयएएस पद मिळविल्याचे सांगितले. प्रशासन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालते, ही जाणीव ठेवून कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. चालू घडामोडींचा संदर्भ लक्षात घेऊन अभ्यास केल्यास यूपीएससीमध्ये यश मिळू शकते, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
आंबेडकरवादी मिशनमध्ये दिल्ली येथील प्रसिद्ध नेक्स्ट आयएएसचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी निशुल्क उपलब्ध असून अभ्यासिका, वसतिगृह, ग्रंथालय आदी सुविधा देण्यात येतात. तसेच पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिल्ली येथे संपूर्ण व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी दिली.
या सत्कार समारंभाला माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, डॉ. पृथ्वीराज तौर, उत्तम सोनकांबळे, डॉ. यशवंत चव्हाण, व्ही. डी. कोणाले, आर. बी. मादले, प्रा. प्रदीप रोडे, केशव जोंधळे, इंजि. राजे पाटील, भगवान धबडगे, दिगंबर मोरे, गौतम कांबळे, गणेश सोंढरे, बालाजी कांटेवाड, जी. सिद्धार्थ, श्रीसागर मामा, डॉ. प्राचार्य सावंत धम्मदीप, वेंकट किडे पाटील, सुशील चिकटे, भारत शिंदे, जयश्री कामाजी पवार, दैवशील गवंदे, करुणाताई तारु, डॉ. प्रतीक्षा तलंगकर, डॉ. बी. आम्रपाली, ऐश्वर्य चिकटे (लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) यांच्यासह निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp