भोंदूगिरीविरोधात राजकीय पक्षांनी आचारसंहिता तयार करावी व कठोर भूमिका घ्यावी; – अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

मुंबई ,दि.२१ : राज्यात वाढत्या भोंदूगिरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी ठोस भूमिका घेत आचारसंहिता तयार करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. भोंदू बुवाबाबांचे उदात्तीकरण थांबवून वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित वर्तन करणे ही सार्वजनिक जीवनातील नेत्यांची जबाबदारी असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

      महाराष्ट्राला संत, समाजसुधारकांचा पुरोगामी वारसा लाभला असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी भोंदूगिरीला राजकीय पाठबळ मिळत असल्याचे चित्र समोर येत आहे. नाशिक येथील तथाकथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्या लैंगिक शोषण प्रकरणामुळे ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या प्रकरणात गंभीर गुन्ह्यांअंतर्गत अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून आक्षेपार्ह साहित्य आणि ५८ व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे समाजमन अस्वस्थ झाले आहे.
समितीने या घटनेचा तीव्र निषेध करत म्हटले आहे की, “दैवी शक्ती”, “मंत्र-तंत्र” यांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून विशेषतः महिलांचे शोषण केले जात आहे. काही प्रभावशाली राजकीय नेते व मान्यवर यांच्या संपर्कामुळे अशा भोंदूंना सामाजिक प्रतिष्ठा मिळते आणि त्यांच्या कृत्यांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळते, ही चिंतेची बाब आहे.
    या पार्श्वभूमीवर समितीने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आरोपी अशोक खरात याच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा द्यावी, इतर संभाव्य पीडितांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित वातावरणात तक्रार करण्यास प्रवृत्त करावे, तसेच जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत सर्व बाबींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, विद्यमान जादूटोणा विरोधी कायद्यात ज्योतिष व भविष्यकथन यांचा समावेश करावा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे नियम तात्काळ मंजूर करावेत, अशी मुख्य मागणी समितीने केली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपल्या नेते व पदाधिकाऱ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आचारसंहिता तयार करून भोंदूगिरीला पाठबळ देणे थांबवावे, असेही समितीने बजावले आहे.
     भारतीय संविधानाने वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि विचारशीलता यांचा पुरस्कार केला असून सार्वजनिक जीवनातील प्रत्येक घटकाने या मूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे, असे समितीने नमूद केले. समाजालाही अंधश्रद्धेपासून दूर राहून विवेकाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निवेदनावर राज्याध्यक्ष माधव बावगे, उपाध्यक्ष डॉ.अशोक बेलखोडे,  राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे तसेच गजेंद्र सुरकार, डॉ. ठकसेन गोराने, विनायक सावळे, विजय परब आणि रुकसाना मुल्ला (राज्य प्रधान सचिव) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp