राज्यस्तरीय ‘विवेक वाहिनी परिषद’ १४ मार्चला उरण-ईश्वरपूर येथे


उरण-ईश्वरपूर(जि.सांगली) : विवेक जागर संस्था, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय, उरण-ईश्वरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘विवेक वाहिनी परिषद’ शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. “वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी युवा” (Youth for Scientific Temperament) ही परिषदेची संकल्पना असून राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापक यात सहभागी होणार आहेत.

या परिषदेचे उद्घाटन माजी मंत्री व आमदार Jayant Patil यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील (अण्णा) राहणार आहेत.
         कार्यक्रमात सकाळी नोंदणी व अल्पोपहारानंतर विवेक वाहिनीच्या कार्यअहवालाचे प्रदर्शन पाहणी होईल. त्यानंतर उद्घाटन सत्र पार पडेल. प्रमुख उपस्थितीत डॉ. टी. जे. शिंदे, संजय बनसोडे, प्राचार्य आर. डी. सावंत, कृष्णात स्वाती, माधव वाघोले, ॲड. धैर्यशील पाटील, डॉ. संतोष जेठेथोर, प्राचार्य डॉ. विठ्ठल धुळे आणि प्राचार्य डॉ. सविता शेटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
     परिषदेच्या दुसऱ्या सत्रात “समाजमाध्यमे आणि तरुणाई” या विषयावर पत्रकार प्रशांत कदम (मुंबई) यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक वसंत भोसलें राहतील. तर तिसऱ्या सत्रात “वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी युवा” या विषयावर लेखक व माहिती तंत्रज्ञ अच्युत गोडबोले (पुणे) यांचे मार्गदर्शन होणार आहे.
      दुपारच्या सत्रात “राज्यातील विवेक वाहिनीचा आढावा आणि भविष्यवेध” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून विवेक वाहिनीचे प्रतिनिधी आपले विचार मांडणार आहेत. समारोप सत्रात विवेक वाहिनीचा संकल्प व परिषद समारोप कार्यक्रम होणार आहे.
     परिषदेत सहभागी होण्यासाठी १२ मार्चपूर्वी संबंधित महाविद्यालयामार्फत नोंदणी करणे आवश्यक असून प्रत्येक महाविद्यालयातून एक प्राध्यापक व दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. परिषद निशुल्क असून पूर्ण वेळ उपस्थित राहणाऱ्या सहभागी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp