किनवट : किनवट व माहूर तालुक्यातील घनदाट जंगल आणि डोंगररांगांच्या सान्निध्यात वसलेल्या तांड्यांमध्ये साजरी होणारी ‘तांडे री होली’ ही केवळ रंगांची उधळण नसून सांस्कृतिक परंपरा, नातेसंबंधांची उब आणि लोककलेचा जल्लोष यांचा संगम आहे. शहरांकडे रोजगारासाठी गेलेले तांड्यातील बांधव होळीच्या निमित्ताने पुन्हा गावाकडे परततात आणि तांडा पुन्हा एकदा गजबजून जातो.
होळीच्या पंधरा दिवस आधीच तयारीला सुरुवात होते. पळसाच्या फुलांपासून (केसू) नैसर्गिक रंग तयार केले जातात. पौर्णिमेच्या वाढत्या चांदण्यात ‘लेंगी’ या पारंपरिक गीतांचा आणि ‘डपडा’ या चर्मवाद्याच्या तालाचा सुरेल संगम घडतो. चांदण्यांच्या धुंद प्रकाशात गाणी रंगतात आणि तांड्यातील वातावरण भारावून जाते,अशी माहिती मांडवीचे युवा व्यावसायिक चंदन मांडणं हे हर्षोल्लासात सांगतात.
हरपणीकार मोहन काका पवार यांच्या ‘मतरो’ आणि ‘जो कोणी मळो वेदेम, ऊ मळो हरप्पणीर गीदेम’ या पुस्तकांतील काही लेंगी गीतांमधून बंजारा स्त्रियांच्या अलंकारांचे आणि सौंदर्याचे वर्णन आढळते. बंजारा समाजातील सोनार बांधवांनी घडवलेले दागिने—हासलो, घुगरी, तितरी, भुरीया—यांचे गीतांमधून कौतुक केले जाते. लोकसंगीताच्या माध्यमातून दागिन्यांचे महत्त्व आणि स्त्रीसौंदर्याचे वर्णन प्रभावीपणे मांडले जाते.
या सणात ‘धुंड’ ही विशेष परंपरा जपली जाते. ज्या घरात नवजात बाळाचा जन्म झालेला असतो, त्या घरी जाऊन डपड्याच्या तालावर आनंदोत्सव साजरा केला जातो. बाळाच्या गळ्यात साखरेची माळ घालून आशीर्वाद दिला जातो. तसेच, होळीपूर्वी निधन झालेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन सांत्वन करण्याचीही प्रथा आहे. दुःखात सहभागी होऊन एकोप्याची भावना जपली जाते.
तांड्यातील महिलांचा उत्साहही तितकाच रंगतदार असतो. होळीच्या दिवशी भाभी, आजी-आजोबा, लहान-मोठे सर्वजण रंगांची उधळण करताना पारंपरिक गंमती-जमती करतात. कधी लाकडी काठीने हलकेच मारत ‘मारी होळी रं कमाई काढ र तू...’ असे म्हणत हसत-खेळत पैशांची मागणी केली जाते.
‘होळी आई रं, होळी डगर चाली...’ अशा पारंपरिक गीतांनी तांडा दुमदुमतो आणि आनंदाची लहर सर्वदूर पसरते.
‘तांडे री होली’ हा केवळ सण नसून सामाजिक एकोपा, परंपरेचा अभिमान आणि निसर्गाशी असलेले नाते जपणारा उत्सव आहे.
Tags
||महाराष्ट||


