गोकुंदा येथील खड्डेमय रस्त्याविषयी १८ मार्चपासून प्राणांतिक उपोषण

मारोती सुकंलवाड

किनवट,ता.१७ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१(अ) वरील भोकर–धनोडा मार्गावरील गोकुंदा येथील सेंट मेरीज स्कूल–बाळासाहेब ठाकरे चौक ते पेट्रोल पंप दरम्यानचा रस्ता अत्यंत खड्डेमय व निकृष्ट झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याचे तातडीने बांधकाम करण्यात यावे, या मागणीसाठी जेष्ठ शिवसैनिक मारोती कोनबाजी सुंकलवाड  यांनी ता. १८ मार्चपासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

   याबाबत त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, किनवट यांना निवेदन दिले आहे. मागील सुमारे सहा वर्षांपासून या रस्त्याचे बांधकाम रखडले असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वारंवार अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. धुळीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
   या संदर्भात नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे अर्ज व निवेदने दिली असून प्रसारमाध्यमांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप सुंकलवाड यांनी केला आहे.दरम्यान, रस्त्याचे तातडीने बांधकाम करून वाहतूक सुरळीत करावी, अन्यथा १८ मार्च रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ठाकरे चौक, गोकुंदा (ता.किनवट) येथे प्राणांतिक उपोषणास सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच किनवट पोलिस ठाण्यास देण्यात आली आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp