किनवट,दि.३० : भारत जोडो युवा अकादमी संचालित साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, MIDC, कोठारी (ता. किनवट) येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक बेलखोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच हे शिबिर पार पडले. ग्रामीण भागातील रुग्णांना नेत्रविषयक उपचारासाठी शहराकडे जावे लागू नये, या उद्देशातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात आर्णी येथील ख्यातनाम नेत्ररोगतज्ञ डॉ. तेजस केशववार यांच्यासह सिद्धेश केशववार, सोनल दासरवार, कोमल बोबडे यांनी सेवा दिली. तसेच हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ञ डॉ. भाग्यश्री बेलखोडे-वरटकर, डॉ. योगेंद्र वरटकर, डॉ. दुर्गा काकडे, डॉ. विद्या गोलकोंडावार व डॉ. शिवानी बेलखोडे यांनीही सक्रिय सहभाग घेतला.
शिबिरादरम्यान मोतीबिंदू, काचबिंदू, डोळ्यातील तिरळेपणा, चष्म्याचे नंबर तसेच शस्त्रक्रियेसंदर्भात रुग्णांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.एकूण ५५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २६ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून १३ रुग्णांना चष्म्याचे नंबर देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा गित्ते यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. विद्या गोलकोंडावार यांनी मांडले. आभार प्रदर्शन अजय जाधव यांनी केले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी वर्गाचे मोलाचे योगदान लाभले.
Tags
||जिल्हा||


