किनवटमध्ये ३१ मे रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा; गरजू वधू-वरांसाठी सुवर्णसंधी


किनवट, ता. २ : सध्याच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर विवाहसोहळ्यांचा खर्च सर्वसामान्य कुटुंबांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे सामूहिक विवाह मेळावे ही काळाची गरज बनली असून, अशा उपक्रमांना समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या ता. ३१ मे रोजी किनवट शहरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा विवाह सोहळा किनवट येथील कलावती गार्डन येथे पार पडणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबातील वधू-वरांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक वधू-वरांच्या पालकांनी आशिष सेवाभावी संस्था यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन मेळाव्याचे अध्यक्ष अजय कदम यांनी केले आहे.
     या उपक्रमाचे मुख्य संयोजक दीपक ओंकार असून, राजेंद्र शेळके हे आयोजक म्हणून कार्यरत आहेत. व्यंकटराव नेम्मानीवार, अॅड. मिलिंद सर्पे, डॉ. आनंद भालेराव आणि अॅड. सुनील येरेकार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष अजय कदम, उपाध्यक्ष वसंत राठोड, कार्याध्यक्ष मारोती गायकवाड, सचिव लक्ष्मीकांत दराडे यांच्यासह अतुल दर्शनवाड, विशाल हलवले, प्रशांत कोरडे, राजू गायकवाड, आकाश आळणे, संतोष गुरूनुले, कपिल कांबळे, प्रमोद मुनेश्वर, राहुल चिखलीकर, डी. के. उमरीकर, राजकुमार सूर्यवंशी, बाळासाहेब कावळे, विजय कदम, नारायण शिनगारे आणि नवीन जाधव आदी पदाधिकारी व सदस्य सक्रियपणे कार्यरत आहेत.
     सामूहिक विवाह मेळावे हे केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच नव्हे, तर सर्वच स्तरातील नागरिकांसाठी लाभदायक ठरत असून, यात वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होते. त्यामुळे अधिकाधिक पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.दरम्यान, अशा सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानेही आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp