
डॉ.अशोक बेलखोडे
किनवट : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा साने गुरूजी रुग्णालयाचे संस्थापक डॉ. अशोक बेलखोडे यांना वर्ष २०२४-२५ साठी प्रतिष्ठेचा ‘कै. कमलाकर ठाणेकर सामाजिक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. लक्ष्मीबाई बाबूराव दामोदर स्मृती प्रकाश आनंद प्रतिष्ठान, मुंबई (रजि.) यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
डॉ. बेलखोडे हे पूज्य बाबा आमटे यांच्या कार्यातून प्रेरित होऊन सामाजिक सेवेत सक्रिय आहेत. तसेच त्यांच्यावर साने गुरूजींचा प्रभाव राहिल्याने त्यांनी किनवट येथे साने गुरूजी रुग्णालयाची स्थापना करून गोरगरीब आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. ‘भारत जोडो’ आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारामध्ये रोख २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि शाल-श्रीफळ यांचा समावेश आहे. स्वातंत्र्यसैनिक व माजी नगरसेवक कै. कमलाकर ठाणेकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. त्यांनी आपले निवासस्थान ट्रस्टला देऊन सामाजिक कार्यासाठी मोठे योगदान दिले होते.
हा पुरस्कार १३ जून २०२६ रोजी किनवट येथे विशेष समारंभात डॉ. बेलखोडे यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी विश्वस्त नरेंद्र मेस्त्री यांनी दिली आहे.या सन्मानामुळे किनवटसह ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Tags
||महाराष्ट्र||