किनवट : नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असूनही किनवट तालुका विकासाच्या बाबतीत अपेक्षित प्रगती करू शकलेला नाही. तालुक्यात एकूण १९१ गावे असून त्यांचा कारभार पाहण्यासाठी १३४ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. अलीकडील काळात शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असला तरी त्या निधीतून झालेल्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.भौतिक सुविधांपुरता मर्यादित विकास हा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास नसून, प्रत्येकाच्या हाताला काम मिळणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच विकासाचे खरे मापदंड आहेत. मात्र, किनवट तालुक्यात रोजगाराच्या संधींचा अभाव असल्याने युवकांना शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे. यामुळे गावांची आर्थिक गती मंदावली असून स्थानिक अर्थव्यवस्था अधिकच कमकुवत होत चालली आहे.
तालुक्यातील विकासकामांसाठी प्राथमिक स्तरावरचे नियोजनही प्रभावीपणे राबवले गेले नसल्याचे दिसून येते. अनेक योजना कागदावरच राहिल्या असून प्रत्यक्षात अंमलबजावणी अपुरी आहे. उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर न झाल्याने शेतीपूरक उद्योग, लघुउद्योग, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय यांसारख्या क्षेत्रांत अपेक्षित वाढ झालेली नाही.
वनसंपत्ती आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या भागात पर्यटन क्षेत्राला मोठी संधी आहे. इस्लापूर येथील सहस्त्रकुंड धबधबा, उनकेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर यांसारखी ठिकाणे प्रसिद्ध असतानाही तेथे मूलभूत सुविधा, निवास व्यवस्था, स्वच्छता आणि दळणवळणाची साधने अपुरी आहेत. रस्त्यांची दयनीय अवस्था आणि नियोजनाचा अभाव यामुळे पर्यटकांची संख्या वाढत नाही. योग्य नियोजन व गुंतवणूक केल्यास पर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते.
दरम्यान, विकासाच्या नावाखाली बॅनरबाजी ,जाहीरातीवर जोर, बैठका, घोषणा आणि चर्चा यांचा धडाका सुरू असला तरी प्रत्यक्षात ठोस कृती दिसत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करून दीर्घकालीन नियोजनावर भर देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.किनवट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ निधी नव्हे, तर प्रामाणिक इच्छाशक्ती, पारदर्शक अंमलबजावणी आणि स्थानिक गरजांवर आधारित नियोजन आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे.
Tags
||जिल्हा||
