किनवट प्रवेशद्वाराचा १ किमी रस्ता तातडीने डांबरीकरण करा- डॉ.अशोक बेलखोडे

डॉ.अशोक बेलखोडे

किनवट : किनवट शहराच्या प्रवेशद्वारावरील नॅशनल हायवे क्रमांक १६१ (ए) वरील सेंट मेरी स्कूल (गोकुंदा) ते पेट्रोल पंपापुढील पुलापर्यंतचा सुमारे एक किलोमीटरचा रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, त्याच्या तातडीने दुरुस्ती व दर्जेदार डांबरीकरणाची मागणी जोर धरत आहे.

   साने गुरुजी रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोक बेलखोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनातून हा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी नमूद केले की, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. तसेच उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार वाढत आहेत, तर खड्ड्यांमुळे वाहनधारकांच्या पाठी व कण्याच्या तक्रारीतही वाढ होत आहे.
    देशभरात महामार्गांचे जाळे विकसित होत असताना किनवटवासीयांना मात्र खड्डे, धूळ आणि धूर यांचा सामना करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ एक किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून होत असलेली टाळाटाळ ही गंभीर बाब असून, यामागे उदासीनता असल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नुकतेच हिमायतनगर रेल्वे फाटकाजवळील खराब रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून, त्याच धर्तीवर किनवटमधील या रस्त्याचेही काम दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
     ‘थातूर-मातूर’ दुरुस्ती न करता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून मजबूत डांबरीकरण करून हा रस्ता तातडीने वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी डॉ. बेलखोडे यांनी नागरिकांच्या वतीने केली आहे.
यासंदर्भात त्यांनी अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम), खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी नांदेड तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाची प्रत पाठवून त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp