लातूर, दि. २४ : महात्मा जोतिबा फुले यांचे द्विशताब्दी स्मृतिवर्ष, सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती, कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अंबेजोगाई ते कळंब या दरम्यान ‘लोकसंवाद पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा २७ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत सुमारे २० गावांमधून मार्गक्रमण करणार आहे.
समाजभारती (लातूर), जिल्हा सर्वोदय मंडळ (लातूर), जयप्रभा ग्रामीण विकास मंडळ (अंबेजोगाई), मराठवाडा जनता विकास परिषद (लातूर, अंबेजोगाई, कळंब शाखा), सत्यशोधक समाज, G-२४ व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विविध शाखांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या पदयात्रेदरम्यान दररोज तीन ते चार गावांमध्ये जाऊन पर्यावरण संवर्धन, सेंद्रीय शेती, जमीन व पाणी व्यवस्थापन, पारंपरिक बियाण्यांचे जतन, लोकशाही मूल्यांचे संरक्षण, संविधान जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, प्लास्टिक निर्मूलन, ग्रामसभा सक्षमीकरण, आरोग्य व शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर जनजागरण करण्यात येणार आहे. यासोबतच तज्ज्ञांचे मार्गदर्शनही ग्रामस्थांना मिळणार आहे.
ही पदयात्रा विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण व स्वावलंबी भारत घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे. तसेच ग्रामविकास व सामाजिक परिवर्तनाशी संबंधित पुस्तकांचे प्रदर्शन व विक्रीची सोयही पदयात्रेसोबत उपलब्ध राहणार आहे.
पक्षनिरपेक्ष व सांप्रदायिक सौहार्द जपणाऱ्या या ‘विचार दिंडी’त नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन प्रा. सोमनाथ रोडे, शिवाजी खोगरे, माधव बावगे, शरद देशपांडे, नागनाथ तोंडारे, प्रदीप चव्हाण, शिरीष अपेट, दयानंद देशमुख, हरिदास तम्मेवार, नरसिंग घोडके, के. ई. हरिदास, दादाराव शिंदे व प्रा. शंकर भोसले यांनी केले आहे.
Tags
||महाराष्ट||