लातूर : 'अंनिस', चे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांचा नागरी सत्कार सोहळा लातूर येथे अत्यंत उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीनेनुकताच पार पडला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने विचारांची समृद्ध देवाणघेवाण घडवून आणली.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मान्यवराने दिलेल्या वेळेत (५ मिनिटे) नेमकेपणाने आपले मनोगत व्यक्त केले. लातूरच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे, रांजणी साखर कारखान्याचे चेअरमन बी. बी. ठोंबरे, जातमुक्त सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे, उपाध्यक्ष अशोक बेलखोडे, कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी मोजक्या पण प्रभावी शब्दांत आपले विचार मांडले.
सत्कारमूर्ती माधव बावगे यांनी सुमारे १५ मिनिटांच्या मनोगतात आपल्या संपूर्ण कार्याचा आणि जीवनप्रवासाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांच्या भाषणादरम्यान ते काही क्षण भावनिक झाल्याचेही पाहायला मिळाले.
प्रमुख पाहुणे जयदेव डोळे यांनी आपल्या भाषणातून प्रभावी मांडणी करत नियोजित वेळेपूर्वीच आपले विचार पूर्ण केले. अध्यक्षीय समारोप सोमनाथ रोडे यांनी केला.
कार्यक्रमाचे “मिनिट टू मिनिट” नियोजन हे विशेष आकर्षण ठरले. सांस्कृतिक कार्यक्रमात सृष्टी शृंगारे हिने ‘प्रकाश बीजे’ आणि ‘हम होंगे कामयाब’ ही गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
नागरी सत्कार असला तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि समविचारी कार्यकर्त्यांनी संयोजनात मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमानंतर शरद झरे व संगीता झरे या दांपत्याने लोकसहभागातून उभारलेल्या ‘माझं घर’ या ६२ मुला-मुलींच्या प्रकल्पात सर्वांसाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे कार्यक्रमाची सांगता सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात झाली.
Tags
||महाराष्ट्र||
