किनवट : जुनापानी(ता .माहूर) येथील दिशा पवार हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर जागतिक कीर्तीच्या London School of Economics (LSE) या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवून मोठे यश संपादन केले आहे. तिने MSc in Economics for International Development या अभ्यासक्रमासाठी तीला प्रवेश मिळाला असून पुढील दोन वर्षांच्या शिक्षणासाठी भारत व ब्रिटन सरकारकडून संयुक्त शिष्यवृत्तीही तिला मिळाली आहे.
कृषी विभागातील अधिकारी अमित पवार यांची कन्या असलेल्या दिशाने Fergusson College, पुणे येथून इंग्रजी, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांसह पदवी शिक्षण पूर्ण केले. मागील वर्षभर ती सातत्याने अभ्यास करत होती. नुकताच तिच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि तिच्या मेहनतीला यशाची किनार लाभली.
दिशाच्या या यशामुळे पवार कुटुंबासह राठोड परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आई अनिता पवार व वडील अमितकुमार पवार यांनी मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आणि त्याग आज फळाला आले आहेत. नांदेड, दिल्ली, हैद्राबाद आणि पुणे अशा विविध ठिकाणी स्थलांतर करत त्यांनी मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले.
जागतिक स्तरावरील या संस्थेत प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण मानले जाते. या संस्थेत पूर्वी B. R. Ambedkar, Manmohan Singh, C. Rangarajan, तसेच Narendra Jadhav यांसारख्या मान्यवरांनी शिक्षण घेतले आहे. अशा संस्थेत ग्रामीण व आदिवासी पार्श्वभूमीतील दिशाने मिळवलेले यश विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
गोरबंजारा समाजातील मुलींसाठी दिशा एक प्रेरणादायी आदर्श ठरत असून तिच्या यशामुळे किनवट, माहूर व नांदेडसह सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तिची ही कामगिरी नव्या आशा व प्रेरणेचा किरण ठरत आहे. दिशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षण घेऊन महाराष्ट्र व देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.
Tags
||महाराष्ट्र||
