किनवटमध्ये प्रथमच मोफत दंत तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


किनवट,ता२५ : भारत जोडो युवा अकादमी संचालित साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, MIDC, कोठारी, किनवट येथे प्रथमच आज(ता.२५)आयोजित करण्यात आलेल्या मोफत दंत रोग तपासणी व उपचार शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    हे भव्य शिबिर हॉस्पिटलचे संचालक  डॉ. अशोक बेलखोडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील रुग्णांना दंत उपचारांसाठी मोठ्या शहरात जावे लागू नये, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचा एकूण ३१ रुग्णांनी लाभ घेतला.


या शिबिरामध्ये सुप्रसिद्ध दंत तज्ञ डॉ. विक्रम बेलखोडे तसेच मानसी व्यवहारे, डॉ. विद्या गोलकोंडावार यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. यावेळी साने गुरुजी हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ञ डॉ. भाग्यश्री बेलखोडे - वरटकर, डॉ. योगेंद्र वरटकर, डॉ. दुर्गा काकडे, डॉ. शिवानी बेलखोडे व बाबासाहेब सूर्यवंशी उपस्थित होते.


शिबिरात रूट कॅनल ट्रीटमेंट, दातांच्या रंगाची फिलिंग, कृत्रिम दात (कवळी) बसविणे, अक्कलदाढ शस्त्रक्रिया, तसेच क्लिप (ब्रेसेस) लावून वेडेवाकडे दात सरळ करण्याबाबत रुग्णांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दुर्गा काकडे यांनी केले. शिबिराचे प्रास्ताविक डॉ. विद्या गोलकोंडावार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अजय जाधव यांनी मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारीवृंदाचे मोलाचे योगदान लाभले.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp