लातूर, दि. २ : खोपेगाव येथील सैलानी बाबा दरबारात अंधश्रद्धा, जादूटोणा व भोंदूगिरीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोपेगाव येथील मारोती चंदरराव मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक तक्रार अर्ज क्रमांक १४/२०२६ ची चौकशी केल्यानंतर संबंधित व्यक्ती अंगारा लावणे, यंत्र देणे, पोटी बांधणे आदी प्रकार करून रोग बरे करण्याचे दावे करत असल्याचे निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या माध्यमातून लोकांना अनिष्ट प्रथा व जादूटोण्याकडे प्रवृत्त करून आर्थिक लाभ घेत असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद संभाजी पवार यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणाचा पाठपुरावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष माधव बावगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने केला होता. यामध्ये प्रा. दशरथ भिसे, सुधीर भोसले, दगडू पडिले, समाधानताई माने, रुकसाना मुल्ला, उत्तरेश्वर बिराजदार आणि डॉ. हणेश गोमारे यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या तक्रारी व निवेदनांच्या आधारे चौकशी प्रक्रिया गतीमान झाली असल्याची माहिती समोर आली आहे.अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या कारवाईचे स्वागत करत अशा प्रकारच्या भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Tags
||महाराष्ट्र||
