वैज्ञानिक दृष्टिकोनाची नवी पिढी घडविण्यासाठी ‘डॉ. जयंत नारळीकर फेलोशिप’; ३० जूनपर्यंत अर्जाची संधी.


किनवट, ता. १८ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प विभाग व सर्वेक्षण व संशोधन विभागाच्या वतीने "डॉ. जयंत नारळीकर वैज्ञानिक जाणीवा लर्निंग फेलोशिप २०२६-२७" (Youth for Scientific Temperament) या उपक्रमासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवादी विचार आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ही फेलोशिप राबविण्यात येत आहे.

या फेलोशिपमध्ये सहभागी युवकांना MAGIC Learning Model अंतर्गत Mindful Observation, Analytical Thinking, Gender & Human Values, Inquiry & Evidence तसेच Constitutional Scientific Citizenship या विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. फेलोशिपदरम्यान माध्यमिक शाळांमध्ये वैज्ञानिक जाणीवा सत्रे घेणे, विज्ञान क्लब स्थापन करणे, "चमत्कारामागील विज्ञान" प्रात्यक्षिके सादर करणे, अंधश्रद्धा, अफवा आणि छद्मविज्ञानावर संवाद घडविणे, पर्यावरण, किशोरावस्था, लैंगिकता व लिंगभाव विषयक जनजागृती करणे तसेच संविधान व वैज्ञानिक दृष्टिकोनाशी संबंधित विविध उपक्रम राबविण्याची संधी मिळणार आहे.
फेलोंसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर, अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष शाळांमध्ये काम करण्याची संधी, अभ्यास साहित्य, मासिक चिंतन बैठक, प्रमाणपत्र आणि उत्कृष्ट फेलो पुरस्कार यांचा समावेश करण्यात आला आहे.
   १८ ते ३५ वयोगटातील पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विज्ञानप्रेमी नागरिक तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अर्ज करण्यास पात्र आहेत. प्रश्न विचारण्याची वृत्ती, शिकण्याची तयारी, समाजपरिवर्तनाची जाणीव आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर विश्वास असलेल्या युवकांना या फेलोशिपमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.फेलोशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२६ असून निवड प्रक्रिया ऑनलाईन अर्ज व मुलाखतीद्वारे होणार आहे.
    अधिक माहितीसाठी दिगंबर कटयारे (मो. ९८६०३११३२२), डॉ. हरीश पेटकर (मो. ९४०३६१८३७५), कृष्णात (मो. ८६००२३०६६०) आणि आरती (मो. ८६५२२२३८०३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp