परंपरेच्या चौकटी मोडणाऱ्यांनीच घडवली खरी सामाजिक क्रांती : डॉ. शंकर विभुते

 


नांदेड : समाजसुधारकांचे दोन प्रकार असतात. एक केवळ विचार मांडणारे आणि दुसरे प्रत्यक्ष कृतीतून समाजपरिवर्तन घडवणारे. मात्र खरी सामाजिक क्रांती त्या महामानवांनी घडविली, ज्यांनी परंपरेच्या चौकटी मोडून नवा आदर्श निर्माण केला. राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे अशा क्रांतिकारी समाजसुधारकांच्या अग्रस्थानी असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. शंकर विभुते यांनी केले.



     भारतीय पिछडा शोषित संघटन, नांदेड यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशतकी वर्षानिमित्त, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  एस. जी. माचनवार होते. व्यासपीठावर संभाजीराव धुळगंडे, लक्ष्मणराव क्षीरसागर, प्रज्ञाधर ढवळे, सत्कारमूर्ती साहित्यिक डॉ. वसंत राठोड, सतिशचंद्र शिंदे (जिल्हाध्यक्ष), राजेश चिटकुलवार, लक्ष्मणराव लिंगापुरे, प्रा. डॉ. मारोती लुटे, प्रा. डॉ. बालाजी यशवंतकर, महाजन सूर्यवंशी, प्रा. सुनील राठोड, रविंद्र बंडेवार, प्रा. डॉ. विरभद्र स्वामी, प्रा. दत्ता पवार, सौ. अंजली राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
    डॉ. विभुते म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बालपणापासून शिक्षणाची कास धरत तत्कालीन सामाजिक बंधने झुगारून दिली. पतीच्या निधनानंतर सती न जाता राज्यकारभार समर्थपणे सांभाळला, समाजकल्याणाला प्राधान्य दिले आणि अनेक पुरोगामी निर्णय घेतले. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ रोवत मागासवर्गीयांसाठी ५० टक्के आरक्षणाची ऐतिहासिक अंमलबजावणी केली. त्यांनी अनेक अनिष्ट प्रथा बंद करून समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा पाया घातला.
यावेळी प्रज्ञाधर ढवळे यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या वैज्ञानिक आणि विवेकनिष्ठ विचारांवर भाष्य केले. संभाजीराव धुळगंडे व लक्ष्मणराव क्षीरसागर यांनीही मनोगत व्यक्त केले.


    या प्रसंगी साहित्य, समाजप्रबोधन व परिवर्तनवादी विचारांसाठी उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वसंत राठोड यांचा सपत्नीक रोख ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना डॉ. वसंत राठोड म्हणाले, "महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अखिल मानवतेला तारणारे आहेत. समता, बंधुता, न्याय आणि मानवतेचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे."
    यावेळी त्यांच्या 'कल्लोळ', 'आक्रोश', 'जाग पालका', 'जगणं रानफुलाचं' आणि 'सर्वात्मा' या साहित्यकृतींचाही गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीमंत राऊत यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन डॉ. नारायण शिवशेट्टे यांनी केले. सूत्रसंचालन मा. कदम यांनी केले, तर आभार डॉ. दिलीप कोठाळे यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी व नागरिक उपस्थित होते

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp