माहूर येथे बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अधिवेशन
September 19, 2025
0
माहूर, दि.२४ (प्रतिनिधी):
बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी आणि कल्याणकारी योजनांची न्याय्य अंमलबजावणी करण्यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना (CITU संलग्न) यांच्यावतीने जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत जगदंबा धर्मशाळा, माहूर (जि. नांदेड) येथे होणार आहे.
जिल्ह्यासह राज्यभरात मोठ्या प्रमाणावर बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण झाल्यामुळे खऱ्या कामगारांना योजनांचा लाभ मिळत नाही, अशी नाराजी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली. ९० दिवसांच्या कामाचा दाखला न मिळाल्याने पात्र कामगार नोंदणीपासून वंचित राहत असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात शासन गंभीर नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात जबाबदार अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा इशारा देण्यात आला आहे. अधिवेशनात कामगारांच्या हक्कांवर सखोल चर्चा,कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन,भविष्यातील संघटनात्मक आराखडा व तातडीच्या समस्यांवर ठोस धोरण आखण्यात येणार आहे.
    यावेळी अॅड. एम.एच. शेख, राज्याध्यक्ष,  'सिटु'संलग्न संघटना, विजय गाभणे, ज्येष्ठ कामगार नेते,उज्वला पडलवार, राज्य सचिव व जिल्हाध्यक्षा (सिटु), गंगाधर गायकवाड, जिल्हा सरचिटणीस (सिटु) यांच्यासह शंकर सिडाम, शेतकरी नेते,किशोर पवार, शेतकरी नेते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
या अधिवेशनातून कामगारांच्या हक्कांसाठी पुढील लढ्याची दिशा ठरविण्यात येणार असून, बांधकाम कामगार बांधव-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक कॉ. जनार्धन काळे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Tags
Post a Comment
0 Comments