आमणापूर, ता. पलूस (सांगली), दि. १९: राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तब्बल ३० जिल्ह्यांतील १७ लाख ८५ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले असून या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी, महाराष्ट्रतर्फे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, मुसळधार पावसामुळे नाल्यालगतची शेती, घरे व गोठे वाहून गेले आहेत. अधिकारी पंचनामे वेळेत न करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. नुकसान सर्वत्र झाल्याने सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे विमा दावे तातडीने अदा करावेत,बँकांकडून सुरू असलेली वसुली थांबवावी,अतिरिक्त बियाणे व खतांचा पुरवठा करावा,पिकांसोबतच जनावरे, घरे व गोठ्यांचे नुकसानभरपाईही द्यावी,पंजाबप्रमाणे हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.निवेदनावर संग्राम घाडगे,प्रदेश संघटन सचिव, आप महाराष्ट्र यांची स्वाक्षरी आहे.
शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून सरकारने तात्काळ ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे आम आदमी पार्टीने निवेदनात नमूद केले आहे.
Tags
महाराष्ट्र