रास्तभाव दुकानदारांसाठी दिलासादायक निर्णय : मार्जीन दरात विस रुपयांची वाढ
September 16, 2025
0
मुंबई :  महाराष्ट्र शासनाने रास्तभाव दुकानदारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यांच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने मोठा दिलासा दिला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार अधिकृत शिधावाटप व रास्तभाव दुकानदारांना ई-पॉस मशिनद्वारे होणाऱ्या अन्नधान्य विक्रीवर मिळणाऱ्या मार्जिन दरात रुपये २० ने वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता प्रति क्विंटल रुपये १७० इतके मार्जिन मिळणार आहे.
ही सुधारित दरवाढ दि. २६ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाली असून, त्या पूर्वी म्हणजे दि. २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत विक्री झालेल्या अन्नधान्यास जुना दर रुपये १५० प्रति क्विंटल लागू राहणार आहे. नव्या दरामुळे दुकानदारांचे उत्पन्न वाढून त्यांचा व्यवसाय अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक सहभागातही बदल करण्यात आले आहेत. केंद्रहिस्सा प्रति क्विंटल रुपये ४५, राज्यहिस्सा प्रति क्विंटल रुपये ४५ आणि अतिरिक्त राज्यहिस्सा प्रति क्विंटल रुपये ८० अशा स्वरूपात परिगणना करण्यात येणार असल्याची स्पष्ट सूचना शासनाने दिली आहे.
या निर्णयामुळे रास्तभाव दुकानदारांना आर्थिक पाठबळ मिळून अन्नधान्य वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढण्यास हातभार लागणार आहे. शासनाच्या या पावलाचे स्वागत करत दुकानदारांनी समाधान व्यक्त केले आहे.
Post a Comment
0 Comments