नांदेड,दि.२९ : आगामी दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकान परवानाधारकांच्या बँक खात्यांवर थकीत मार्जिनची रक्कम तातडीने जमा करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य रास्तभाव दुकान परवानाधारक महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भातील निवेदन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांना जिल्हाधिकारी मार्फत आज(दि.२९) देण्यात आले आहे. महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष देवानंद सरोदे, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कापसीकर व महासचिव राजाभाऊ कुलकर्णि यांच्या स्वाक्षऱ्यानिशी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण राज्यातील परवानाधारकांनी जून, जुलै व ऑगस्ट २०२५ महिन्यांमध्ये ई-पॉस मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांना नियमित वितरण केले आहे. परंतु, अद्यापपर्यंत अनेक परवानाधारकांच्या बँक खात्यांमध्ये त्या कालावधीतील मार्जिन रक्कम जमा झालेली नाही.
ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या दसरा व दिवाळी सणामुळे परवानाधारकांवर आर्थिक ताण येत असून, सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत ही थकीत रक्कम जमा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांनाही प्रतिलिपी पाठविण्यात आली आहे.
Tags
जिल्हा
