Type Here to Get Search Results !

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा : एकजुटीने मुंबईत विराट रॅली आयोजित

मुंबई,दि १६ : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांसाठी जगभरातील सर्वोच्च श्रद्धास्थान असले तरी त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात नाही. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली त्या पवित्र स्थळी आजही अशास्त्रीय कर्मकांड आणि अंधश्रद्धेचे प्रकार होत असल्याने बौद्ध समाजाच्या भावना दुखावत आहेत. महाबोधी महाविहार ट्रस्टमध्ये हिंदू व बौद्ध सदस्य समान संख्येने असून कलेक्टर हिंदू असल्यास तोच अध्यक्ष असतो, ही स्थिती बौद्धांसाठी अस्वीकार्य आहे. भारताचे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले असून त्यापूर्वीचा बिहार विधानसभेचा महाबोधी व्यवस्थापन कायदा (BT Act, 1949) रद्द करावा. सर्व ९ सदस्य आणि अध्यक्ष हे बौद्ध असावेत, अशी प्रमुख मागणी पुढे आली आहे. जसे प्रत्येक धर्माचे धार्मिक स्थळ त्या त्या धर्माच्या ट्रस्टकडे असते, तसेच बौद्धांचे महाबोधी महाविहारही पूर्णपणे बौद्धांच्या नियंत्रणाखाली असावा, अशी भूमिका सर्व बौद्ध संघटनांनी मांडली आहे. या मागणीसाठी महाराष्ट्रभरातील सर्व रिपब्लिकन गट, बौद्ध आंबेडकरी संघटना आणि पक्षीय नेते एकत्र येत असून, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता भायखळा राणीबाग येथून आझाद मैदानापर्यंत शांततापूर्ण विराट रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले. या परिषदेला प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार वर्षाताई गायकवाड, नाना इंदिसे, अर्जुन डांगळे, राजू वाघमारे, जयदेव गायकवाड, अविनाश महातेकर, राम पंडागळे, भाई गिरकर, दैनिक सम्राटचे संपादक कुणाल कांबळे यांसह अनेक बौद्ध नेते उपस्थित होते. तसेच पूज्य भदंत राहुल बोधी महाथेरो, भदंत विरत्न थेरो, भदंत आयुपाल, भदंत शांतिरत्न, भदंत लामा आणि इतर अनेक संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले. १४ ऑक्टोबर हा दिवस विशेष महत्त्वाचा असून, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन देशात धम्मचक्र प्रवर्तन केले होते. म्हणूनच या दिवशी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभरातील बौद्ध आंबेडकरी जनता, मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, पालघर आणि इतर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी या विराट रॅलीत सहभागी होण्याचा संकल्प करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. रॅलीस ॲड. प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

Post a Comment

0 Comments