‘आशा’ : ग्रामीण आरोग्य लढ्याची नायिका


नांदेड : आज(दि.२०) नांदेड शहरात ‘आशा’ हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याचा योग आला. आशा संघटनेच्या कार्यकर्त्या तसेच प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने संपूर्ण शो हाऊसफुल झाला होता.

सन २००५ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (NRHM) राबविण्यात आले. या माध्यमातून कंत्राटी आरोग्य कर्मचारी गावागावात पोहोचले. मात्र ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी केवळ कर्मचारी नव्हे, तर गावातच राहणाऱ्या महिलांची सक्रिय भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अनेक अशासकीय स्वयंसेवी संस्थांनी पुराव्यानिशी अधोरेखित केले होते.
महाराष्ट्रात २००७–०८ पासून गावातील रहिवासी, आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या महिलांना संस्थात्मक रुग्णालयांत प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष आरोग्य सेवेसाठी कार्यरत करण्यात आले. त्यांनाच आशा कार्यकर्ती (Accredited Social Health Activist) असे नाव देण्यात आले.
पुरुषप्रधान समाजरचनेत गरोदर माता, प्रसूतीनंतरच्या व स्तनदा मातांना भारतीय संविधानाने दिलेले अधिकार व हक्क प्रत्यक्षात मिळवून देण्यासाठी आशा कार्यकर्तींनी दिलेला संघर्ष अत्यंत मोठा आहे. ही लढाई केवळ एखाद्या पुस्तकात किंवा चित्रपटात पूर्णपणे समजून घेणे शक्य नाही.
आशा कार्यकर्तींच्या अथक परिश्रमांमुळे पहिल्या दशकात संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढले तसेच माता मृत्यूदर व नवजात शिशू मृत्यूदरात लक्षणीय घट झाली. याच कामगिरीच्या जोरावर आज शेकडो राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे ओझे आशा कार्यकर्तींच्या खांद्यावर सोपविण्यात आले आहे.
रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबाला मदत केल्यानंतर मिळणारा मानसिक समाधानाचा अनुभव हाच आशा कार्यकर्तींचा खरा मोबदला ठरतो. अत्यल्प मानधनातही त्या निष्ठेने काम करू शकतात, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
आज ग्रामीण आरोग्य व्यवस्था असंसर्गजन्य आजारांच्या (बीपी, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार इ.) चक्रव्यूहात अडकली आहे. सामाजिक प्रतिष्ठेसाठी वैद्यकीय शिक्षणाकडे पाहण्याची ‘लातूर पॅटर्न’ मानसिकता ग्रामीण आरोग्याच्या गरजांशी फारकत घेत असल्याचे वास्तव आहे.
अशा परिस्थितीत असंसर्गजन्य आजारांशी प्रभावी लढा द्यायचा असेल, तर केवळ डॉक्टरांकडून अपेक्षा न ठेवता आशा कार्यकर्तींचे क्षमता बळकटीकरण (Capacity Building) हाच एकमेव व्यवहार्य पर्याय उरतो.
हे सर्व करत असताना आशा कार्यकर्तींना माणूस म्हणून सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक आर्थिक सुरक्षितता मिळावी, यासाठी त्या सातत्याने रस्त्यावर संघर्ष करत आहेत. या संघर्षात भारतीय नागरिक म्हणून आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नोंदवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.
गावगाड्यातील सरंजामी विचारसरणी व पुरुषी अहंकारामुळे पुरुषांचेही मानसिक व शारीरिक आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुरुषांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘पुरुष आशा’ या संकल्पनेची गरज प्रकर्षाने जाणवते.
सन २०२२ मध्ये World Health Organization ने भारतातील आशा कार्यकर्तींच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत ग्लोबल हेल्थ लीडर अवॉर्ड प्रदान केला. चित्रपटात काही त्रुटी असल्या, तरी या निमित्ताने आपण किमान एका तरी आशा ताईच्या संघर्षाची, समर्पणाची व आरोग्यसेवेतील लढाईची जाणीव करून घेणे आवश्यक आहे.


– डॉ. प्रताप
(समुदाय आरोग्य अधिकारी)
हिमायतनगर, नांदेड
दि. १९/१२/२०२५
📧 pratapvimalkeshav@gmail.com
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp