Type Here to Get Search Results !

चोरीने हैराण बळीराजा! दरसांगवीत शेतमालमत्तेचा मोठा तोटा

किनवट,दि.१५: तालुक्यातील दरसांगवी येथील शेतकरी अरविंद सूर्यवंशी यांच्या शेतातील विद्युत मोटार, केबल, पाईप, सोलार संच अज्ञात चोरट्यांनी लंपास केले असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता या चोरीच्या घटनेने नवे संकट ओढवले आहे. सतत घडणाऱ्या अशा चोरीच्या घटनांमुळे दरसांगवी परिसरातील शेतकरी भीती आणि संतापात आहेत. शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे चोरट्यांना अटक करून जेलबंद करण्याची तसेच नुकसानभरपाईची मागणी केली आहे. या भागात गेल्या काही महिन्यांपासून विद्युत मोटारी, केबल, पाईप आणि अन्य शेतीसंबंधी साहित्याच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. संबंधित प्रकरणात किनवट पोलिसांत गुन्हा दाखल होऊनही पंधरा दिवसांनंतरही कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, "गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना कारवाई करायला पंधरा दिवस लागत असतील, तर न्यायासाठी आम्ही कोणाकडे जावे?" दरम्यान, सततच्या पावसामुळे आधीच पिकांचे नुकसान झालेल्या बळीराजावर आता चोरीचे संकट कोसळले आहे. सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी आणि केबल चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे शेतीकाम ठप्प झाले असून त्यांचे जगणे अधिक कठीण बनले आहे. दरसांगवी (चि) शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी, पाईप आणि अन्य शेतीतील अवजारे चोरांनी लंपास केल्याने संपूर्ण परिसरात असंतोषाचे वातावरण आहे. वेळीच पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments