Type Here to Get Search Results !

नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षणामुळे किनवटच्या राजकारणात नवे समीकरण घराण्यांच्या पाठबळावर महिलांची दावेदारी, उमेदवार निवडीसाठी भाजपात चढाओढ

किनवट,दि.१६ : नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी यंदा खुल्या महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकारणात नव्या घडामोडी वेगाने घडत आहेत. भाजप, काँग्रेस तसेच दोन्ही शिवसेना गटांकडून एकूण दहा महिलांची नावे चर्चेत असून, बहुतेक उमेदवारांच्या मागे घराण्यांचा राजकीय वारसा आणि प्रभावी पाठबळ असल्याचे चित्र दिसते. मागील कार्यकाळात (२०१७–२०२२) किनवट
नगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती. निवडणुका होणार असल्याने आता पुन्हा सत्तेवर झेंडा फडकविण्याची भाजप कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे. सध्याचे आमदार भीमराव केराम हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले असल्याने भाजपाची आघाडी मजबूत मानली जाते. माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनामुळे विरोधकांची ताकद काहीशी कमी झाल्याने, भाजपात नगराध्यक्षपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक सक्रिय झाले आहेत.जर नगराध्यक्षपद खुले पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झाले असते, तर या घराण्यांतील पुरुष सदस्यच मैदानात उतरले असते. मात्र, महिला आरक्षणामुळे या नेत्यांनी आपल्या पत्नी, मातोश्री किंवा स्नुषांना उमेदवारीसाठी पुढे करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे या निवडणुकीत नगरकारभारात सक्रिय असलेल्या घराण्यांतील महिलाच प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहेत. प्रत्यक्षात महिलांपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांमध्येच नगराध्यक्षपदासाठीची चुरस अधिक जाणवत असून, त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. भाजपकडून ज्योती सुधाकर भोयर, रमणा अनिल तिरमनवार, पुष्पा आनंद मच्छेवार, सुहासिनी श्रीनिवास नेम्मानीवार, निकिता स्वागत आयनेनीवार, अनुजा किरण नेम्मानीवार आणि रमणा यादवराव नेम्मानीवार ही सात नावे आघाडीवर आहेत. यापैकी दोन उमेदवारांना नगरसेवकपदाचा अनुभव असून, सर्वांच्याच कुटुंबीयांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष किंवा नगरसेवक म्हणून शहरविकासात भूमिका बजावली आहे. हेच त्यांच्या उमेदवारीचे मुख्य बळ मानले जात आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते उमेदवार निवडताना पक्षनिष्ठा, कार्यकर्तृत्व, शहरातील जनसंपर्क, शिक्षण आणि जनाधार या निकषांना प्राधान्य देणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र स्थानिक गटबाजी आणि वरिष्ठ नेत्यांचा प्रभाव लक्षात घेता, अंतिम निर्णयात तडजोडीचे राजकारणही दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ महिला नेतृत्वापुरती न राहता, गटसंतुलनाचीही मोठी कसोटी ठरणार आहे. काँग्रेसकडून शिरीषा गिरीश नेम्मानीवार यांचे नाव चर्चेत आहे .त्यांचे सासरे यादवराव नेम्मानीवार यांनी उपनगराध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून सुजाता विनोद एंड्रलवार तर शिंदे गटाकडून लक्ष्मी व्यंकटराव भंडारवार यांची नावे चर्चेत आहेत. दोन्ही घराण्यांचा स्थानिक पातळीवर चांगला जनाधार असून, त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रभाव मतदारांमध्ये दिसून येतो. दरम्यान, पूर्वी नगराध्यक्षपद भूषवलेल्या मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेते हाजी इसाखान सरदारखान, हाजी निसारखान, साजीदखान, तसेच दिवंगत उपनगराध्यक्ष चाँदसाब रतनजी यांचे वारसदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे जहीरोद्दीनखान आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे हाजी हबीबभाई चव्हाण यांनीही उमेदवारीची तयारी केली होती. मात्र, महिला आरक्षणामुळे या नेत्यांचा पुढील निर्णय काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0 Comments