किनवट : अखिल भारतीय किसान सभेच्या हाकेला प्रतिसाद देत बलिप्रतिपदा दिनी किनवट तालुक्यासह जिल्हाभर शेतकऱ्यांनी गावोगावी आक्रोश आंदोलन केले.
सोयाबीनचा सरकारी हमीभाव प्रति क्विंटल ५३२८ रुपये जाहीर असूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फक्त ३६०० ते ३७०० रुपये दरानेच विक्री करावी लागत आहे.
राज्य सरकारने अद्याप हमीभाव खरेदी केंद्र सुरु न केल्याने शेतकरी संतप्त असून, भाजपप्रणित फडणवीस सरकारच्या या “दुटप्पी धोरणा”विरोधात किसान सभेच्या नेतृत्वाखाली अनेक गावांमध्ये आंदोलन झाले.
दीपला नाईक तांडा, तोटंबा, पालाईगुडा, नागापूर, कुपटी, लोखंडवाडी, नंदगाव रिठा, दयाळ धानोरा, बुरकलवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांनी प्रत्येक घरातून एक मूठ सोयाबीन जमा करून गावच्या चौकात ओतून निषेध व्यक्त केला.
शेतकऱ्यांचा संताप केवळ सोयाबीनपुरता मर्यादित नसून, कापूस, मका आणि इतर पिकांनाही योग्य दर मिळत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
गावोगावी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. अर्जुन आडे, खंडेराव कानडे, अमोल आडे, शेषराव ढोले, शिवाजी किरवले, सिताराम आडे, सुनील राठोड, पांडुरंग जाधव, सुरेश जाधव, रंगराव चव्हाण, मनोज सल्लावार, इंदल राठोड, विजय जाधव, अडेलू बोनगीर, प्रशांत जाधव, मोहन जाधव आदींनी केले.
“सोयाबीनला जाहीर हमीभाव ५३२८ रुपये असताना शेतकऱ्यांना केवळ ३६०० ते ३८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आधी अस्मानी आणि आता सुलतानी संकटांनी शेतकरी भरडला जात आहे. शासनाने तातडीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करून दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारला बुडवल्याशिवाय राहणार नाही.”
- कॉ. अर्जुन आडे ,राज्य उपाध्यक्ष, किसान सभा




Post a Comment
0 Comments