Type Here to Get Search Results !

डॉ. आंबेडकर व न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यांचा काँग्रेसकडून निषेध : नांदेडमध्ये धरणे आंदोलन

नांदेड : संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच महाराष्ट्राचे भूमिपुत्र मा. भूषण गवई यांच्याविरोधात करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांप्रकरणी नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या निषेधार्थ काँग्रेस कमिटीकडून येत्या १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ, रेल्वे स्टेशन, नांदेड येथे धरणे व निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाद्वारे काँग्रेसकडून जातीखोर मनुवादी विचारसरणीचे वकील राकेश किशोर आणि अनिल मिश्रा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे. पक्षाच्या अनु. जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करणार असून सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “संविधान व न्यायव्यवस्थेचा अपमान सहन केला जाणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर केलेली ही वक्तव्ये भारतीय लोकशाहीच्या मूल्यांवर हल्ला आहेत.” नांदेडमध्ये होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

Post a Comment

0 Comments