Type Here to Get Search Results !

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सर्वपक्षीय बौद्ध नेत्यांची ऐतिहासिक एकजूट

मुंबई, दि. १४ : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी आज(दि.१४) मुंबईत आझाद मैदानावर विराट शक्तिप्रदर्शन करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा निघाला. रखरखत्या उन्हात हजारो बौद्ध आंबेडकरी बांधवांनी उपस्थित राहून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन यशस्वी केले. या आंदोलनात राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व रिपब्लिकन गट आणि बौद्ध संघटनांचे नेते एकत्र आले होते. ना. आठवले म्हणाले, “केल्याशिवाय ऐक्याचा प्रहार मुक्त होणार नाही महाबोधी महाविहार!” त्यांनी पुढे सांगितले, “मी मंत्री असलो तरी कार्यकर्ता आहे. नामांतर चळवळीपासून मी रस्त्यावर उतरलो, आता महाबोधी महाविहार मुक्तीसाठीही तसाच लढा देत आहे. बिहारमध्ये कोणतेही सरकार असले तरी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे. बी.टी. ॲक्ट रद्द करून महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती दिलेच पाहिजे.” या मोर्चात पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो, भंते विनाचार्य, भदंत हर्षवोधी, आकाश लामा यांच्यासह अनेक भिक्खू संघ सहभागी झाले होते. आंदोलन कृती समितीच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, नानासाहेब इंदिसे, सुरेश माने, सौ. सीमाताई आठवले, सुलेखाताई कुंभारे, खासदार वर्षाताई गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार राजकुमार बडोले, संजय बनसोडे, बालाजी किणीकर, संतोष बांगार, अर्जुन डांगळे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन गौतम सोनवणे यांनी केले. तसेच अविनाश महातेकर, देशक खोब्रागडे, जयदीप कवाडे, आनंद शिंदे, राजू वाघमारे, तानसेन ननावरे, बुद्धभूषण गोटे, रवी गरुड, विलास रूपवते, विवेक पवार आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments