Type Here to Get Search Results !

"शेतकऱ्यांचा आक्रोश : देवाभाऊला २१ लाखांचा बेड, पण शेतकऱ्यांना न्याय नाही!"

किनवट, दि. ६ : अतिवृष्टीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे हाल पाहूनही शासन मुक आहे... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तर सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात मात्र बेफिकिरी! या अन्यायाविरोधात शिवसेनेतर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलन बुधवारी (दि. ८) सकाळी ११ , जिजामाता चौक, किनवट येथे होणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपनेते बबनराव थोरात (संपर्क प्रमुख, नांदेड) आणि शिवसेना जिल्हा प्रमुख जोतिबा दादा खराटे करणार आहेत. शिवसैनिकांनी शासनावर तीव्र निशाणा साधत विचारले आहे, “देवाभाऊच्या बेडसाठी २१ लाख रुपये खर्च होऊ शकतात, पण अतिवृष्टीने सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांसाठी एक रुपया नाही का?” शेतकऱ्यांच्या तोंडचे अन्न पावसाने हिरावले, कर्जाचे ओझे वाढले, आणि शासन मात्र घोषणांच्या पलीकडे गेले नाही, असा संताप व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेनेच्या मागण्या — अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपयांची तातडीने मदत. संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा. विमा लाभ खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. जुने निकष न लावता न्याय्य व वस्तुनिष्ठ भरपाई देण्यात यावी. शिवसेनेने इशारा दिला आहे की, जर शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष दिले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. किनवटमध्ये या आंदोलनामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, गावागावातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments