आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे आंदोलन : खा. अशोक चव्हाणांचा ताफा अडविला!
October 12, 2025
0
किनवट : अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.११) सारखणी येथे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या ताफ्याला अडवून जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
कापूस पणन महासंघाचे माजी संचालक व ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे यांच्या जीवन गौरव सोहळ्यानिमित्त खा. अशोक चव्हाण आणि माजी आमदार अमर राजूरकर हे माहूर–किनवट दौऱ्यावर होते. माहूर येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांचा ताफा सारखणी येथील सोना गार्डन मंगल कार्यालयात आयोजित पक्षप्रवेश व कार्यकर्त्यांच्या संवाद कार्यक्रमासाठी जात असताना हा प्रकार घडला.
त्या वेळी सारखणी येथे हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजाचे आंदोलन सुरू होते. खा. चव्हाणांचा ताफा दिसताच आंदोलकांनी तुळजाभवानी मंदिराजवळ ताफा रोखून घोषणाबाजी केली.
आंदोलकांनी खा. चव्हाण यांनी या प्रश्नावर आपली स्पष्ट भूमिका घ्यावी, मुख्यमंत्री व राज्य शासनाशी चर्चा करून बंजारा समाजाला न्याय मिळवून द्यावा, तसेच हा मुद्दा राज्यसभेत मांडावा, अशी मागणी केली. खा. चव्हाण यांनी आंदोलकांना संयमाचे आवाहन करत आश्वासन दिल्यानंतर घोषणाबाजी थांबली आणि ताफा नियोजित कार्यक्रमस्थळी रवाना झाला.
अचानक ताफा अडविल्याने पोलिसांचीही काही काळ तारांबळ उडाली.
“संयमाचा अंत पाहू नका!”
आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खा. चव्हाण म्हणाले, “मी शांत आहे म्हणून तुम्ही काहीही बोलावे हे योग्य नाही. माझ्या संयमाचा अंत पाहू नका,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना सुनावले, ज्यामुळे काही काळ वातावरण गंभीर बनले.
बंजारा-आदिवासी संघर्षाचा पुन्हा उद्रेक?
१८ सप्टेंबर रोजी बंजारा समाजाने किनवट येथे भव्य मोर्चा काढत एसटी आरक्षणाची मागणी केली होती. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी आदिवासी समाजाने “अनुसूचित जमाती प्रवर्गात नव्याने कुणालाही आरक्षण देऊ नये” या मागणीसाठी विराट मोर्चा काढला. त्यामुळे दोन्ही समाजांमध्ये तणाव वाढत चालला आहे.
राजकीय नेत्यांची कोंडी
किनवट–माहूर विधानसभा मतदारसंघात बंजारा व आदिवासी समाजाचे लक्षणीय प्राबल्य असल्याने हा प्रश्न आता राजकीयदृष्ट्या अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. निवडणुकांच्या तोंडावर या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे नेत्यांची पंचाईत झाली असून, कोणत्याही एका समाजाची बाजू उघडपणे घेणे त्यांना कठीण ठरत आहे
Tags

Post a Comment
0 Comments