दिवाळीपूर्वी गोकुंदा रस्ता तातडीने दुरुस्त करा; अन्यथा रस्तारोको : माजी सभापती अनिल पाटील यांचा इशारा
October 12, 2025
0
किनवट, दि. १२ :
किनवट–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील गोकुंदा येथील पेट्रोल पंप ते ठाकरे चौक या प्रमुख बाजारपेठेतील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांचा प्रवास जिवघेणा ठरत आहे. दिवाळी सणापूर्वी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, तसेच उड्डाणपुलाचे काम सुरू न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या वतीने रस्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी सभापती तथा विद्यमान संचालक अनिल पाटील कऱ्हाळे यांनी दिला आहे.
या संदर्भात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता यांना नुकतेच निवेदन सादर केले असून, तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.
गोकुंदा परिसरातील पेट्रोल पंप, महाविद्यालय, शाळा आणि उपजिल्हा रुग्णालय या सर्व सुविधा या मार्गावर असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ असते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे. विद्यार्थ्यांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांना खड्यांमधून वाट काढावी लागत आहे.
गोकुंदा येथील रेल्वेगेटवर उड्डाणपूल मंजूर असून, त्याच कारणास्तव रस्त्याची दुरुस्ती टाळली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पुलाच्या कामाचे रेखांकन सुरू झाले होते; परंतु आचारसंहितेमुळे काम थांबविण्यात आले. निवडणुका संपून वर्ष उलटले तरी कामाचा मागमूस नाही.
किनवट–भोकर राष्ट्रीय महामार्गाचे बहुतांश काम सहा वर्षांनंतरही अपूर्ण आहे, आणि काही ठिकाणी रस्ता पुन्हा खचला आहे. त्यामुळे तात्काळ दुरुस्ती व उड्डाणपुलाचे काम सुरू करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने रस्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अनिल पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Post a Comment
0 Comments