Type Here to Get Search Results !

अनैतिक संबंधातील अडथळा ठरलेल्या पतीची प्रियकरासोबत कट रचून हत्या

किनवट, दि.१४ : अनैतिक संबंध टिकवण्यासाठी एका विवाहित स्त्रीने आपल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. पतीला दारू पाजून नदीत ढकलून देण्यात आले होते. पोलिसांनी प्रेयसी व तिच्या प्रियकराला अटक करून खून, अ‍ॅट्रॉसिटीसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. मथुरानगर, किनवट येथील विनोद किसन भगत (वय ५२) यांचे २००३ साली प्रियंका भगत या महिलेशी लग्न झाले होते. दाम्पत्याला दोन अपत्ये आहेत. विनोद भगत यांचे अशोकनगर परिसरात स्वतःच्या नावावर चार खोल्यांचे घर होते. हे घर प्रियंका भगत हिने तिच्या ओळखीतील शेख रफीक शेख रशीद यांच्या मदतीने ३० लाखांना विकले. या व्यवहारानंतर प्रियांका व रफीक यांचे संबंध निकट झाले.घर विक्रीच्या पैशांच्या वाटणीवरून विनोद व प्रियंका यांच्यात वारंवार वाद होत होते. यासोबतच प्रियांका व रफीक यांचा संबंध वाढला. पती हा त्यांच्या मार्गातील अडथळा ठरत असल्याने दोघांनी त्याला संपवण्याचा कट रचला.दि. २९ ऑगस्टच्या रात्री रफीक व प्रियंकाने विनोद भगत यांना मद्यपानास भाग पाडले. नशेत बेशुद्ध झाल्यानंतर रफीक याने त्यांना मोटारसायकलवर बसवून खरबी पुलावर नेले व पैनगंगा नदीत ढकलले. दि. २ सप्टेंबर रोजी महागाव परिसरात त्यांचा मृतदेह सापडला आणि पोलिसांनी पंचनामा करून अंत्यसंस्कार केले.तपासादरम्यान विनोद भगत यांच्या बहिण नंदा पाटील यांनी संशय व्यक्त केला. सीडीआर तपासानंतर पोलिसांना रफीक व प्रियंका यांच्या संगनमताचा पुरावा मिळाला. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक झाडे व त्यांचे सहकारी करत आहेत.

Post a Comment

0 Comments