थारा–सावरी मार्ग बंद; रेल्वे संपर्कही विस्कळीत, शेतकऱ्यांची चिंता वाढली
किनवट,ता.३१ : किनवट तालुका आणि शहर परिसरात सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अपूर्ण रस्ते आणि प्रलंबित कामांमुळे वाहतुकीची परिस्थिती गंभीर बनली आहे.
बुधवारी दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे किनवट–नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ (अ) वरील थारा–सावरी दरम्यानचा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला. सुमारे ५० फूट लांबीपर्यंत चिखल साचल्याने एक अवजड वाहन अडकून पडले. त्यामुळे रात्रीपासून वाहतूक बंद झाली.
परिणामी धानोरा किंवा नांदेडकडे जाणारी वाहने थारा–दिग्रस–चंद्रपूर तांडा–सावरी या पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत. मात्र या लहान रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी असून अवजड वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. लहान चारचाकी कसाबसा मार्ग काढत असले तरी खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवास धोकादायक ठरत आहे. पोलिसांच्या प्रयत्नांनंतर दुपारी १ वाजेपर्यंत वाहतूक अंशतः सुरळीत करण्यात आली, अशी माहिती पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश बोदमवाड यांनी दिली.
शहरातही चिखल व कोंडी
किनवट शहरातील मुख्य रस्त्याचे काम पुन्हा ठप्प झाल्याने वाहतूक कोंडी, खड्डे व अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. प्रमुख चौकांत पाणी साचल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे.
राष्ट्रीय महामार्ग व पुलाची कामे रखडली
राष्ट्रीय महामार्गाचे तसेच रेल्वे उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने वाहतुकीत कायम अडथळे येत आहेत. नागरिकांनी संबंधित विभागाकडे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
रेल्वे संपर्क खंडित
दक्षिण भारतातील मुसळधार पावसामुळे ‘कृष्णा एक्सप्रेस’ ही रेल्वे तिरुपतीपर्यंत न जाता अर्धवट परत आल्याने, आदिलाबाद–नांदेड दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस केवळ मुदखेडपर्यंतच धावत आहे. परिणामी किनवट तालुक्याचा रेल्वे संपर्कही विस्कळीत झाला आहे.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
रब्बी पेरणी सुरू असतानाच खरीप हंगामातील काढणीसाठी तयार पीक शेतातच अडकले आहे. रस्ते बंद आणि वाहतूक ठप्प झाल्याने पीक बाजारात पोचवणे कठीण झाले आहे. अतिवृष्टीमुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागत आहे.

Post a Comment
0 Comments