नाशिक : प्रगतिशील लेखक संघाच्या (Progressive Writers Association) नव्वदी वर्षपूर्तीनिमित्ताने तसेच महान कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक येथे ‘नाशिक जिल्हा प्रगतिशील साहित्य संमेलन’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी नितीन भरत वाघ साहित्यनगरी, रणजीत परदेशी विचारमंच, आय एम आर टी हॉल, मविप्र, गंगापूर रोड येथे होणार आहे.
या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी, संशोधक व अभ्यासक प्रा. सचिन गरुड कार्यभार स्वीकारणार आहेत. स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. वंदना नाडे असून उद्घाटक म्हणून ज्ञानेश्वर कोंडाजी मोरे (राज्यकर उपायुक्त, बीकेसी, मुंबई) हे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुण्यांमध्ये अॅड. नितीन ठाकरे (सरचिटणीस, मविप्र), प्रा. डॉ. विलास देशमुख (प्राचार्य, एमएसडब्ल्यू कॉलेज), प्रा. डॉ. प्रशांत सूर्यवंशी (आयएमआरटी कॉलेज), तसेच कॉ. राजू देसले (राज्य सचिव, आयटक; राज्य सहसचिव, सीपीआय) यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता ‘इप्टा परिवार नाशिक’ यांच्या प्रबोधनगीतेने होईल. त्यानंतर उद्घाटन सत्र पार पडेल. दुपारी १२.३० ते १.०० या वेळेत ‘प्रगतिशील सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला असून कामगार नेते करुणासागर पगारे यांच्यासह अनेक समाजकारक, शिक्षक, लेखक आणि कलाकारांना विशेष सन्मान देण्यात येणार आहे.
दुपारी २.०० ते ३.३० या वेळेत परिसंवाद होणार असून विषय आहे — “साम्यवादी विचारांच्या प्रभावात भारतीय साहित्याची जनवादी वाटचाल”. या परिसंवादात सुरेश केदारे अध्यक्षस्थान भूषवतील. सहभागी वक्त्यांमध्ये किशोर मांदळे, कॉ. महादेव खुडे आणि मा. लता कांबळे यांचा समावेश आहे.
तिसऱ्या सत्रात दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत ‘काव्य संमेलन’ आयोजित करण्यात आले असून अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. सुदाम राठोड भूषवतील. अरुण घोडेराव समन्वयक आणि रविकांत शार्दूल सूत्रसंचालक असतील. या सत्रात राज्यभरातील प्रख्यात कवी सहभागी होणार आहेत.
या संमेलनाचे प्रमुख निमंत्रक प्रमोद अहिरे (जिल्हाध्यक्ष, प्रलेसं), अरुण घोडेराव (जिल्हा कार्याध्यक्ष), प्रल्हाद पवार (जिल्हा सचिव) असून आयोजनात मराठा विद्या प्रसारक संस्था, नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, आयटक, दलित अधिकार आंदोलन, इप्टा, समता शिक्षक संघटना, मागासवर्गीय व आदिवासी शिक्षक संघटना यांचे विशेष सहकार्य आहे.
प्रगतिशील विचारांचा, सर्जनशील लेखनाचा आणि समाजपरिवर्तनाचा संदेश देणारे हे संमेलन नाशिकच्या साहित्यजगतासाठी एक मोठा उत्सव ठरणार आहे.