डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या PES संस्थेला महाराष्ट्र सरकारकडून ५०० कोटींचा नवजीवन निधी
October 14, 2025
0
मुंबई,दि.१४ : महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES) च्या मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील कॉलेजेस, शाळा आणि दोन विद्यार्थी वसतिगृहांच्या जीर्णोद्धारासाठी तब्बल ५०० कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.
८ जुलै १९४५ रोजी बाबासाहेबांनी उपेक्षित, शोषित आणि वंचित वर्गासाठी शिक्षणाची दारे खुली ठेवण्याच्या उद्देशाने PES ची स्थापना केली होती. सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज, नाईट कॉलेजेस आणि वसतिगृहे या संस्थांमधून लाखो विद्यार्थ्यांनी डॉक्टर, अभियंते, प्राध्यापक आणि अधिकारी म्हणून यश मिळवले.
काळाच्या ओघात काही इमारती जर्जर झाल्या असल्या तरी या निधीमुळे त्या स्वप्नांना पुन्हा तेज मिळणार आहे. संपूर्ण योजनेचे सूत्रधार सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे हे आहेत. त्यांनी बाबासाहेबांच्या “शिक्षणाद्वारे सामाजिक न्याय” या मिशनला नवसंजीवनी देण्याचा संकल्प केला आहे.
डॉ. कांबळे यांचे कार्य हे IAS पदावर बसूनही समाजकारण आणि परिवर्तन घडवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. याआधी त्यांनी संभाजीनगरमध्ये “डॉ. आंबेडकर अपेक्षित बुद्धिस्ट सेमिनरी” उभारून सांस्कृतिक ठेवा निर्माण केला होता आणि उद्योग विभागात परकीय गुंतवणुकीत विक्रमी यश मिळवले होते.
ही मंजुरी केवळ विटा-मातीच्या दुरुस्तीपुरती नाही, तर बाबासाहेबांच्या विचारांचे पुनरुज्जीवन आहे — जिथे प्रत्येकाला आपला हक्क, आपला आवाज आणि सन्मान मिळेल.
Post a Comment
0 Comments