किनवट :आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने नगराध्यक्षपदासाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. जिल्हाप्रमुख जोतिबा खराटे यांनी किनवट येथे झालेल्या सभेत युवा नेते करण एंड्रलवार यांच्या मातोश्री सुजाता विनोद एंड्रलवार यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले.
महाविकास आघाडीबरोबर एकत्र लढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. “एक नगरपालिका तुम्ही घ्या, एक आम्ही घेऊ” हे आमचे धोरण असले तरी, आघाडी झाली नाही तरी शिवसेना स्वतंत्रपणे लढेल,” असे खराटे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात त्यांनी भाजपवर जोरदार टीका करत म्हटले की, “शेतकरी, शेतमजूर आणि कामगार वर्गाचा भाजपावर प्रचंड रोष आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलल्या. हिंदू-मुस्लिम हा त्यांचा राजकीय अजेंडा आहे, पण या दोन्ही समाजांना एकत्र आणणारा नेता म्हणजे करण एंड्रलवार!”
खराटे पुढे म्हणाले, “या वेळी भाजपाने बंदूक काढली, तर करणभाऊ एके-४७ काढेल! त्यांच्याकडे हायबॉम्ब असेल, तर करणभाऊ अणुबॉम्ब आहे! हा लढा विचारांचा आहे.”
या सभेत तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील, विधानसभा संघटक अनिल रुणवाल, युवानेते यश खराटे, माजी शहरप्रमुख संतोष येलचलवार, तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते व शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील यांनी आवाहन केले की, “या वेळी किनवट नगर परिषदेत भगवा झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा.”
जिल्हाप्रमुखांच्या घोषणेनंतर युवानेते करण एंड्रलवार यांनी आपल्या मनोगतात म्हटले, “मी बोलण्यापेक्षा कामाला प्राधान्य देतो. किनवट शहर सुजलाम-सुफलाम करण्याचा संकल्प घेऊनच आम्ही मैदानात उतरत आहोत. आपले आशीर्वाद पाठीशी राहू द्या, किनवटला ‘सोने की चिडिया’ बनवून दाखवू.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद केंद्रे यांनी केले, तर शहरप्रमुख प्रशांत कोरडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात नगरपरिषद क्षेत्रातील २१ जागांसाठी १०० अर्ज वितरित झाले असून ३७ इच्छुकांची नोंदणी झाली आहे. इच्छुकांनी १ नोव्हेंबरपर्यंत मशाल जनसंपर्क कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.

Post a Comment
0 Comments