किनवट : किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले सचिन नाईक,सचिन नाईक मित्र मंडळ आणि या मंडळाचे शेकडो समर्थक कार्यकर्ते यांनी काल (दि.२५)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश करून स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते देगलूर येथे पार पडला. या वेळी पक्षाचे वरिष्ठ नेते, जिल्हा पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून सचिन नाईक आणि त्यांचे सचिन नाईक मित्र मंडळ हे किनवट-माहूर परिसरात युवकांना संघटित करून सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवत आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे प्रयत्न झाले असून, त्यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या मतदारसंघात नवचैतन्य आणि बळ मिळेल, अशी भावना स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी बोलताना अजितदादा पवार म्हणाले की, “राजकारण हे लोकसेवेचे माध्यम आहे. युवकांनी सकारात्मक विचाराने राजकारणात सहभागी होऊन विकासाच्या वाटेवर काम करणे आवश्यक आहे.”
पक्षप्रवेशानंतर सचिन नाईक यांनी सांगितले की, “अजितदादांच्या नेतृत्वाखाली विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा आमचा निर्धार आहे. किनवट-माहूर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार पोहोचवू"
या कार्यक्रमाला जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील पक्षपदाधिकारी, विविध समाजघटकांचे नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच या प्रवेशामुळे किनवट-माहूर मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Post a Comment
0 Comments