"ओला दुष्काळ जाहीर करा: कर्जमुक्ती व नुकसानभरपाईच्या मागण्यांसाठी किसान सभेचा जाहीर इशारा"
October 10, 2025
0
किनवट, दि.१०: ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी रुपये ५०,००० मदत व शेतमजुरांना प्रति कुटुंब रुपये ३०,००० श्रम नुकसानभरपाई द्यावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा, सिटू आणि शेतमजूर युनियन यांच्या वतीने शुक्रवारी (दि.१०) उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जोरदार धडक आंदोलन करण्यात आले.
रेल्वे स्टेशनपासून फेरीच्या रूपात निघालेल्या शेतकरी–शेतमजुरांच्या मोर्चाने ‘शेतकरी–शेतमजुर एकता जिंदाबाद’च्या घोषणा देत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. अर्जुन आडे,राज्य उपाध्यक्ष, किसान सभा, म.रा., कॉ. शंकर सिडाम ,राज्य सहसचिव, किसान सभा, म.रा., कॉ. किशोर पवार आणि कामगार नेते कॉ. जनार्धन काळे यांनी केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, महिला आणि कामगार सहभागी झाले होते.
गत ऑगस्ट–सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, राज्य सरकारने फक्त गुंठ्याला रुपये ८५ इतकी तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी टीका कॉ. अर्जुन आडे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या रुपये ३१ हजार कोटींच्या विशेष पॅकेजमध्ये नांदेड जिल्ह्याला भोपळा दिला असून शासन निर्णयात नांदेडचा उल्लेखच नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
पंजाब आणि कर्नाटक राज्यांमध्ये एकरी रुपये ५० हजार मदत दिली जाते, मग महाराष्ट्रात अन्याय का? असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त केला.
ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा,शेतकऱ्यांना एकरी रुपये ५०,००० मदत व शेतमजुरांना प्रति कुटुंब रुपये ३०,००० श्रम नुकसानभरपाई द्यावी,शेतकरी–शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी,सर्व पिकांना १००% विमा संरक्षण देऊन सरसकट परतावा द्यावा,पशुधन नुकसानीसाठी रुपये ८०,००० मदत जाहीर करावी,रोजगार हमी अंतर्गत मजुरांना रुपये ८०० मजुरीसह तातडीने काम उपलब्ध करावे,वाहून गेलेल्या जमिनींचा बाजारभावानुसार मोबदला द्यावा,पुरग्रस्तांना प्रति घर रुपये २५,००० सानुग्रह मदत द्यावी व विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक फी माफ कराव्यात,या मोर्चाच्या मागण्या आहेत.
आंदोलनकर्त्यांनी या मागण्यांचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित दोनतुल्ला यांना दिले. यावेळी कॉ. अमोल आडे, डॉ. बाबा डाखोरे, संजय मानकर, इरफान पठाण, खंडेराव कानडे, आडेलु बोनगीर, शेषेराव ढोले, मनोज सल्लावार, इंदल राठोड, राजकुमार पडलवार, विजय जाधव, सीताराम आडे, रंगराव चव्हाण, मोहन जाधव, दिगंबर आगीरकर, अंबर चव्हाण, चंपाती पोत्रे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments